राहुल बाळा ही इटली नाही, हा हिंदुस्थान आहे : उद्धव ठाकरे

राहुल बाळा ही इटली नाही, हा हिंदुस्थान आहे : उद्धव ठाकरे


बुलडाणा:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. राहुल बाळा ही इटली नाही हा हिंदुस्थान आहे, इथे देशद्रोह्याला जागा नाही, अशी एकेरी टीका उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर केली. ते बुलडाण्यात बोलत होते.

विधानसभा निवडणुकीवेळी सेना-भाजप युती तुटली तेव्हा शरद पवार सरकारवर टीका करत होते. शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही? अशी विचारणा करत होते.  कारण आम्ही बाहेर पडल्यावर यांना भाजपसोबत युती करायची होती, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. जवळपास 25 मिनिटांच्या भाषणात त्यांनी शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, मुलायम सिंह, मायावती आदींवर टीका करत युतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

उद्धव म्हणाले “कन्हैया, दाऊदसारख्यांना वाचविण्यासाठी राहुल गांधीना देशद्रोह्याचा कायदा काढून टाकायचा आहे. मात्र देशद्रोह्याला फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधींसारख्या नेभळटाच्या हातात देश द्यायचा का? आम्ही 370 कलम काढणार असं बोलतो मात्र राहुल गांधी बोलतात की 370 कलम काढणार नाही, आम्ही बोलतो राम मंदिर बांधू, राहुल गांधींच्या जाहीरनाम्यात राम मंदिर कुठेच नाही”

जवानांना हिम्मत देण्यासाठी त्यांना हिम्मत देणारे सरकार निवडून आणण्याचे आवाहन करत, उद्धव ठाकरे यांनी मागच्या सरकारने 50 वर्षात काय केलं तुम्ही आठवा, अशी विचारणा केली.

राहुल गांधींच्या आजीने (इंदिरा गांधी) गरिबी हटावची घोषणा दिली होती. पण गांधींची गरिबी हटली आणि आमचा गरीब तसाच राहिला, असा हल्ला उद्धव ठाकरेंनी केला.

शौर्याचं राजकारण करण्याचा हक्क कुणालाही नाही. मात्र विरोधकांनी जवानांच्या शौर्याचं खच्चीकरण करू नये, असंही उद्धव म्हणाले.

मोदीजी आता पाकड्यांचे कंबरडे मोडा, उद्या आपल्यावर हल्ले करायला शिल्लक राहता कामा नयेत. शरद पवार पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील. आजपर्यंत जेव्हा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा काहीही झाले नाही. पण आता दोन वेळा पाकिस्तानवर हल्ले झालेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI