ठाकरे दोन दिवस अधिवेशनात आले, पण केलं काय? फिरायचं आणि…उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारे शब्द
उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाच. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोले लगावले होते. आता त्याला एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने सणसणीत उत्तर दिलं आहे.

“उद्धव ठाकरे स्वतःच दुतोंडी आहेत. काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी शिवसेनेची काय अवस्था केली? याचं उत्तर त्यांनी आधी स्वतःला विचारावं आणि मग एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी” राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अशा शब्दात हल्लाबोल केला. “ठाकरे दोन दिवस अधिवेशनात आले. पण त्यांनी केलं काय? त्यांनी अधिवेशनामध्ये सवाल उपस्थित केला का? कुठला मुद्दा उपस्थित केला का? फिरायचं, पत्रकार परिषद घ्यायच्या, टोमणे मारायचे आणि निघून जायचं एवढचं काम त्यांनी केलं” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
“मुंबईत महापौर हा मराठीच असेल असं आम्ही सुद्धा बोलतोय आणि मराठी महापौरच आम्ही करू. बोलताय ते बरोबर आहे, बऱ्याच लोकांनी पीएसडी करून 40-45 हजार रुपये घेतलेले आहेत आणि विनाकारण याचा गैरवापर होतोय. त्यामध्ये बदल होणं गरजेचे आहे याची सुरुवात आमच्यापासूनच झाली होती. आम्ही त्यामध्ये बदल करावा अशी मागणी केली होती आणि त्याचा पाठपुरावा देखील करत आहे” असं संजय शिरसाट म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना डिवचलं
उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाच. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोले लगावले. विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीवर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करून एकनाथ शिंदे यांना डिवचलं. ‘उपमुख्यमंत्री पदाला काही महत्त्व नाही’ असं ठाकरे म्हणाले. “भाजपचे नेतेच म्हणाले की, नंबर एकलाच महत्त्व असतं. नंबर दोनचं महत्त्व नाही” असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांची ही टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीच आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अधिवेशनात सत्ताधारी आमदाराला बोलण्याची संधी नाही
“नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदारांना सभागृहात बोलण्याची संधीच मिळत नाही. अनेक लक्षवेधी अध्यक्षांकडे लावून धरल्यात तरी मात्र सभागृहामध्ये त्या लक्षवेधी मांडायची एकही संधी येत नाही. विरोधक तर हैराण पण मात्र सत्ताधारी आमदार असून बोलायची संधी नाही याबद्दल नाराजी असेलच. अधिवेशन संपत आलं तरीदेखील सभागृहात बोलायची संधी मिळत नाही. लक्षवेधी होतात पण बोलू दिलं जात नाही. उपमुख्यमंत्र्यांकडे ही बाब सांगणार न्याय मागणार” असं आमदार अमशा पाडवी म्हणाले.
