वंचित बहुजन कोणासोबतच आघाडी करणार नाही : अबू आझमी

येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणाशीही आघाडी करणार नाही. कारण ही आघाडी होऊ नये अशा विचाराचे लोक त्यांच्या मागे उभे आहेत, असे वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केले आहे.

वंचित बहुजन कोणासोबतच आघाडी करणार नाही : अबू आझमी

वर्धा : “येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (vanchit bahujan aghadi) कोणाशीही आघाडी करणार नाही. कारण ही आघाडी होऊ नये अशा विचाराचे लोक त्यांच्या मागे उभे आहेत, असे वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी (Samajwadi Party abu azmi) यांनी केले आहे. तसेच आमदार निवडून येऊ देत अथवा नाही त्यांना स्वतंत्र लढण्यात फायदा आहे असेही आझमी यांनी सांगितले.” वर्ध्यात एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

“तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी वंचित आघाडी त्यांच्यासोबत जाणार नाही असे सध्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे वेळ पडली, तर पक्ष छोटा करावा. पण धर्मनिरपेक्ष लोकांचे विभाजन होऊ नये असा प्रयत्न केला पाहिजे असेही आझमी यावेळी म्हणाले.”

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास यात्रा आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद दौऱ्यावरही आझमी यांनी टीका केली. जेवढ्या यात्रा काढायच्या तेवढ्या काढा, पण जनतेने सत्ताधाऱ्यांना सत्तेत असताना काय केले असा प्रश्न विचारायला पाहिजे. तसेच सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास असे म्हणता ना, मग मॉब लिचिंगच्या घटना का थांबत नाही याचे उत्तर सरकारने द्यायला पाहिजे असेही आझमी यांनी सांगितले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करणारे प्रश्न मीडिया विचारते, त्यामुळे जनतेनेच आता सत्ताधाऱ्यांना हे प्रश्न विचारायला हवेत अशीही टीका आझमी यांनी केली. भाजपच्या मागे मोठा रिमोट कंट्रोल आहे, तो आरएसएसचा असू शकतो, देशातील मोठ्या उद्योगपतींचा असू शकतो, हेच लोक आपल्या मर्जीने सरकार चालवत असल्याची टीका त्यांनी केली.

जे लोक आजपर्यंत धर्मनिरपेक्षताच्या गोष्टी करत होते, तेच आता सत्तेच्या मोहापायी लोटांगण घालत भाजपात सामील होत आहेत. हे सर्व पाहून खंत वाटते. यांचा विचार केवळ पैसा आणि सत्ता असल्याने असे लोक देशात राहिले तर देशाचे भले कसे होणार असा प्रश्नही अबू आझमींनी उपस्थित केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *