मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये ठिणगी

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून, शिवसेना-भाजप महायुती कामाला लागली आहे.

मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये ठिणगी

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून, शिवसेना-भाजप महायुती कामाला लागली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडली आहे. महाराष्ट्रात आगामी मुख्यमंत्रीही भाजपचाच असेल, हा भाजपच्या नेत्यांचा दावा शिवसेनेला अमान्य असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह म्हणाले होते. अमित शाह यांच्या वक्तव्याला राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही समर्थन दिले होते.

एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य आणि प्रतिक्रिया येत असताना, अखेर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटवरुन मोठं वक्तव्य केलं आहे.

वरुन सरदेसाई नेमकं काय म्हणाले?

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्टीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीत महाराष्ट्रात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या तडजोडीच्या बैठकीला उपस्थित नसलेल्यांनी आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी युतीतील वातावरण बिघडवू नये.”, असे ट्वीट युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केले आहे.

वरुण सरदेसाई कोण आहेत?

वरुण सरदेसाई हे शिवसेनेची युवा संघटना असलेल्या युवासेनेचे सरचिटणीस आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. लोकसभा निवडणुकीत वरुण सरदेसाई हे शिवसेनेच्या स्टार कॅम्पेनरमध्येही होते. शिवसेना आणि युवासेनेत वरुण सरदेसाई यांना मोठं महत्त्व आहे.

अमित शाह काय म्हणाले होते?

महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये आगामी रणनीती आखण्यावर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात येत्या तीन महिन्यात विधानसभेची निवडणूक होईल. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असं अमित शाह बैठकीत म्हणाल्याची माहिती आहे. भाजपच्या या भूमिकेनंतर शिवसेनेत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. युतीने महाराष्ट्रात 48 पैकी 41 जागा मिळवत लोकसभेला घवघवीत यश मिळवलं होतं.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत धुसफूस सुरु झाली आहे. जागा वाटपाच्या भाजपने जाहीर केलेल्या फॉर्म्युल्यावर शिवसेनेचे नेते खाजगीत नाराजी व्यक्त करीत असताना, मुख्यमंत्रीपदाच्या भाजपच्या दाव्यावरही शिवसेनेत आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, असं बैठकीत सांगितल्याने शिवसेनेतून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

मात्र, आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले व युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनीच ट्वीट करुन, भाजप-शिवसेना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेईल, असे सांगितल्याने आता नवी चर्चा सुरु झाली आहे. आता भाजपच्या गोटातून वरुण सरदेसाई यांच्या माहितीवर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *