‘प्रियांका राजकारणात येईल, तेव्हा लोक मला विसरतील’

‘प्रियांका राजकारणात येईल, तेव्हा लोक मला विसरतील’

नवी दिल्ली : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधी यांची वर्णी लागली आहे. यासोबतच प्रियांका गांधी आता राजकीय मैदानात उतरल्या आहेत. अनेक वर्षांपासून प्रियांका गांधीनी राजकारणात सक्रीय व्हावे अशी मागणी होती. प्रियांका गांधी यांच्यातील राजकीय गुण त्यांच्या आजी म्हणजेच माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी लहानपणीच ओळखले होते. ‘जेव्हा प्रियांका येईल तेव्हा लोक मला विसरुन जातील, तिची आठवण करतील’, असे इंदिरा गांधींनी म्हटले होते.

काँग्रेसचे चाणक्य म्हटले जाणारे आणि इंदिरा गांधींचे सर्वात विश्वासू नेते माखनलाल फोतेदार यांनी 2015 साली इंदिरा गांधी प्रियांकाबाबत काय विचार करायच्या याबाबतचा एक प्रसंग सांगितला होता.

फोतेदार यांनी सांगितले की,

“त्यावेळी इंदिराजी यांनी मला सांगितले की, माझ्या घरी एक मुलगी आहे. तिचं भविष्य खूप चांगल असणार आहे. जेव्हा ती मोठी होईल. थोडाफार विचार करु लागेल, तेव्हा लोक मला विसरुन जातील, तिची आठवण काढतील.”

“आता मी ज्या स्थानावर आहे, भविष्यात ती देखील इथे पोहोचू शकते. तिच्या हातात जेव्हा देशाची धुरा येईल तेव्हा ती देश सांभाळण्यास सक्षम असेल.”

इंदिरा गांधींनी प्रियांकासाठी अनेक स्वप्न बघितली होती, प्रियांकामध्ये त्या स्वत:ला बघायच्या. त्या प्रियांका गांधींना स्वत:प्रमाणे पंतप्रधानांच्या खुर्चीवर बघायच्या, असे फोतेदार सांगतात.

इतर कुठल्याही आजीप्रमाणे इंदिरा गांधींसाठी त्यांचे नातवंड प्रियांका आणि राहुल हे अतिशय लाडके होते. हेच त्यांच्या कुटुंबाचं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवतील, त्यांच्या घराण्याचा हा राजकीय वारसा त्यांचे नातवंड पुढे नेतील अशी इंदिरा गांधीना आशा होती. त्यातच प्रियांका गांधी या तर नेहमीच इंदिरा गांधींची आठवण करुन देतात. त्यांच्या वागण्यात, हसण्यात, बोलण्यात नेहमीच इंदिरा गांधींचा भास होतो.

आता प्रियांका या राजकारणात प्रत्यक्षपणे सक्रीय झाल्याने इंदिरा गांधींनी त्यांच्यासाठी बघितलेली स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI