बारामतीत सातवा 'कोरोना'ग्रस्त, न्यूमोनियाचं निदान झालेल्या रुग्णाचे रिपोर्ट 'कोरोना' पॉझिटिव्ह

बारामतीत सातवा रुग्ण आढळल्याने प्रशासनाने आणखी कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेत नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. (Baramati New Corona Patient found)

बारामतीत सातवा 'कोरोना'ग्रस्त, न्यूमोनियाचं निदान झालेल्या रुग्णाचे रिपोर्ट 'कोरोना' पॉझिटिव्ह

बारामती : बारामती शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातवर पोहोचली आहे. आदल्या दिवशी न्यूमोनियाचं निदान झालेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या समर्थनगरमधील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती, नवा रुग्णही त्याच परिसरातील आहे. (Baramati New Corona Patient found)

सोमवारी न्यूमोनियाचं निदान झालेल्या रुग्णाला पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे काल (मंगळवार 14 एप्रिल) स्पष्ट झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी याच परिसरात असलेल्या समर्थनगरमधील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला होता. त्यानंतर आता याच परिसरात 75 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, बारामतीत सातवा रुग्ण आढळल्याने प्रशासनाने आणखी कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

हेही वाचाइस्लामनुसार प्रार्थना करा, शासकीय नियमानुसार अंत्यविधी करा, बारामतीतील कोरोनाबाधित कुटुंबाचा आदर्श

बारामती शहरात मार्चअखेरीस एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर या रिक्षा चालकाच्या कुटुंबासह त्याच्या संपर्कातील सर्वच लोकांची तपासणी होऊन त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळालेला असतानाच आठवड्यापूर्वीच एका भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ त्याच्या सून आणि मुलासह दोन नातींनाही कोरोनाची लागण झाली. अशातच 9 एप्रिलला या भाजीविक्रेत्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

बारामतीची परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र असतानाच पुन्हा ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याने बारामतीतील कोरोनाबाधितांची संख्या आता सातवर गेली आहे. विशेष म्हणजे या ज्येष्ठ नागरिकांची घराबाहेर कसलीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण कशी झाली, याबद्दल आरोग्य विभागाने चौकशी सुरु केली असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचीही माहिती घेतली जात आहे.

बारामतीत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने बारामती पॅटर्न सुरु केला आहे. या पॅटर्नअंतर्गत नागरिकांना घरात थांबून सर्व काही अत्यावश्यक वस्तू पुरवण्यास सुरुवात झाली आहे. अशात आता एक रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाला सहकार्य करुन घरीच थांबण्याचे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

(Baramati New Corona Patient found)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *