ऑफिस बॅगेत चुकूनही या 5 गोष्टी ठेवू नका, तुमच्या प्रगतीत येतील अडथळे
वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्रानुसार ऑफिसच्या बॅगेत काही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. या वस्तूंमुळे कामात अडथळे येणे किंवा नकारात्मकता पसरण्यासारख्या घटना घडू शकतात. असं म्हटलं जातं. जाणून घेऊयात त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या.

प्रत्येक व्यक्तीला करिअरमध्ये यश आणि प्रगती हवी असते. मात्र अनेकदा मेहनत करून देखील यश मिळत नाही. त्यामागे काही वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्राच्या गोष्टींचा संबंध देखील असू शकतो. पण बहुतेक वेळेला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याबाबत काही नियम पाळले तर नक्कीच फायदे होऊ शकतात.
ऑफिस बॅगेतील काही गोष्टी तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात
जसं की काहीजण ऑफिसला जाताना कपड्यांचा रंगही निवडतात. तसंच ऑफिसला जाताना तुम्ही नेत असलेली ऑफिस बॅगेही तुमच्या कामातील अडचण ठरू शकते. बॅगेतील काही गोष्टी तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात. त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही ऑफिस बॅगमध्ये ठेऊ नयेत असं वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येतं.
पदोन्नती आणि यशातील अडथळे
वास्तुशास्त्रानुसार, ऑफिस बॅग तुमच्या करिअरच्या उर्जेवर परिणाम करते. ही बॅग तुमच्यासोबत कामाच्या ठिकाणी जाते, त्यामुळे त्यात ठेवलेल्या गोष्टी तुमच्या एकाग्रतेवर, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आणि प्रगतीवर परिणाम करतात. चुकीच्या गोष्टी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, जी पदोन्नती आणि यशात अडथळा आणते.
मेकअप आणि दागिने
महिला अनेकदा त्यांच्या ऑफिस बॅगमध्ये लिपस्टिक, काजळ किंवा छोटे दागिने ठेवतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या गोष्टी शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत, तर ऑफिसच्या वातावरणावर बुध आणि मंगळाचा प्रभाव असतो. या वस्तू एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत करू शकतात. मेकअप आणि दागिने घरी ठेवा आणि ऑफिस बॅगमध्ये फक्त कामाशी संबंधित गोष्टी ठेवा.
नेल कटर किंवा लहान चाकू
ऑफिस बॅगेत नेल कटर किंवा छोटा चाकू ठेवणे सामान्य वाटते, परंतु वास्तुशास्त्रानुसार, या गोष्टी नकारात्मकता वाढवतात. मिळणारी संधी आणि नातेसंबंधात अडथळा येण्याचे संकेत मानले जातात. यामुळे करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात आणि सहकाऱ्यांसोबत तणाव वाढू शकतो. ऑफिस बॅगेत अशा तीक्ष्ण वस्तू ठेवणे टाळा आणि सकारात्मकता टिकवा.
परफ्यूम आणि डिओडोरंट्स
ऑफिस बॅगेत परफ्यूम किंवा डिओडोरंट ठेवणे सर्वांनाच आवडते. परंतु वास्तुशास्त्रानुसार, त्यातील अल्कोहोलचे प्रमाण मानसिक एकाग्रता कमकुवत करते. यामुळे ऑफिसमधील गांभीर्य आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे प्रगतीची गती मंदावू शकते. घरीच परफ्यूम लावून घराबाहेर पडावं आणि बॅगेत फक्त महत्त्वाच्या कामाशी संबंधित गोष्टी ठेवा. तसेच तुम्हाला जर ठेवायचंच असेल तर तुम्ही परफ्यूम ऐवजी अत्तर बॅगेत ठेवू शकता.
वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू
ऑफिस बॅगमध्ये टूथब्रश, कंगवा किंवा कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू ठेवणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते. या गोष्टींचा सभोवतालच्या उर्जेवर परिणाम होतो, ज्यामुळे ऑफिसमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. यामुळे तुमचे कामावरील लक्ष कमी होते आणि ताण वाढतो. अशा गोष्टी घरी ठेवा आणि ऑफिस बॅग व्यवस्थित ठेवा.
घाणेरडे किंवा जीर्ण कपडे
कधीकधी लोक त्यांच्या ऑफिस बॅगमध्ये वापरलेले किंवा घाणेरडे कपडे ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, ही सवय नकारात्मकता वाढवते, ज्यामुळे थकवा आणि चिडचिड होते. यामुळे तुमचे लक्ष कमी होते आणि तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तुमची बॅग स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा जेणेकरून सकारात्मकता टिकून राहील आणि प्रगतीचा मार्ग खुला राहील.
ऑफिस बॅगसाठी टिप्स
वास्तुशास्त्रानुसार, ऑफिस बॅग नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावी. त्यात फक्त आवश्यक वस्तू ठेवा, जसे की लॅपटॉप, नोटबुक आणि पेन. बॅग नियमितपणे स्वच्छ करा आणि अनावश्यक वस्तू काढून टाका. ऑफिस बॅगमध्ये मेकअप, नेल कटर, परफ्यूम, वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू आणि घाणेरडे कपडे ठेवणे टाळा. या गोष्टी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि करिअरमध्ये अडथळे निर्माण करतात.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
