Janmashtami 2025: श्रीकृष्ण जयंतीनिमित्त घरी बनवा मखाणा बर्फी आणि खीर, जाणून घ्या सोपी रेसिपी
जन्माष्टमीनिमित्त बाळ गोपाळ श्रीकृष्ण यांना अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ आणि मिठाई अर्पण केल्या जातात. या खास दिवशी तुम्ही तांदळाची खीर किंवा ड्रायफ्रूट बर्फीपेक्षा काहीतरी वेगळे बनवू शकता. तर आजच्या या लेखात आपण मखाना खीर आणि बर्फी बनवण्याच्या सोप्या रेसिपीबद्दल आपण जाणून घेऊयात...

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. प्रत्येक भक्त नेहमीच श्रीकृष्ण जयंतीची वाट पाहत असतात. तसेच या दिवशी मंदिरे फुलांनी आणि दिव्यांनी सजवली जातात. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रीकृष्णभक्त या दिवशी उपवास करतात. कान्हाच्या लीलाचे देखावे उभारले जातात. तर रात्री अनेक घरांमध्ये कान्हाचा पाळणा गीत गायले जाते, व बाळ गोपाळांना अनेक चविष्ट पदार्थ आणि मिठाई अर्पण केल्या जातात.
श्रीकृष्णाचे आवडते मख्खन-साखर, फळे, खीर आणि पंचामृत अर्पण केले जाते. याशिवाय बरेच लोकं नैवेद्यासाठी सुकामेवा, आणि विविध प्रकारच्या मिठाई बनवतात. याशिवाय तुम्ही मखाना खीर किंवा बर्फी देखील अर्पण करू शकता. मखाना खीर आणि बर्फी घरी बनवणे खूप सोपे आहे. चला आजच्या या लेखात आपण या रेसिपीबद्दल जाणून घेऊयात.
मखाना खीर रेसिपी
मखाना खीर बनवण्यासाठी, प्रथम एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करा. त्यानंतर त्यात मखाना टाका आणि मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. आता हे एका भांड्यात बाजूला ठेवा. आता त्याच पॅनमध्ये आवश्यकतेनुसार दूध उकळण्यासाठी ठेवा. दूध सतत ढवळत राहा, जेणेकरून ते पॅनला चिकटणार नाही. दूध उकळल्यानंतर त्यात भाजलेले मखाना टाका आणि ते चांगले मिक्स करा. गॅसची आच कमी ठेवा. जेव्हा दुधाचे प्रमाण कमी होऊ लागते आणि घट्ट होऊ लागते तेव्हा त्यात साखर टाका आणि चांगले मिक्स करा. आता बदाम, काजू आणि मनुका यांसारखे ड्रायफ्रुट टाका. तुम्ही त्यात केशर देखील घालू शकता. यानंतर खीर 5 ते 10 मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करा. मखाना खीर तयार आहे.
मखाना बर्फी
मखाना बर्फी बनवण्यासाठी, प्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि नंतर त्यात मखाना भाजून घ्या. त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये मखाना काढा. आता त्याच पॅनमध्ये काजू भाजून घ्या. आता मखाना आणि काजू दोन्ही बारीक करून पावडर बनवा. आता पॅन किंवा कढई गॅसवर ठेवा, त्यात किसलेले नारळ टाका आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे हलके सोनेरी होईपर्यंत तळा.
आता त्यात वाटलेला मखाना आणि गरजेनुसार दूध घाला. दूध नीट शोषले जाईपर्यंत ते मंद आचेवर सतत ढवळत शिजवा. आता त्यात साखर किंवा पावडर टाका आणि मिश्रण चांगले शिजवा. त्यानंतर वेलची पावडर आणि सुकामेवा मिक्स करा. आता एका प्लेटमध्ये तूप लावा. आता ही पेस्ट त्यात टाका आणि त्यावर बारीक केलेला सुकामेवा टाका. थंड झाल्यावर तुम्ही हव्या त्या आकारात कापून घ्या.
