जगातील अनोखा गणपती बाप्पा; शीर नसलेल्या मूर्तीची होते पूजा, त्या कथेशी काय कनेक्शन?
Shree Munkatiya Ganesh Temple : जगात गणपतीचे अनेक अनोखे मंदिरं आहेत. पण असं मंदिर तुम्ही पहिल्यांदाच ऐकले अथवा वाचले असेल. येथे धड असलेल्या गणेशाचीच पुजा केली जाते. या गणपतीला डोके नाही. कुठे आहे हे मंदिर?

काल गणेश चतुर्थीला पारंपारिक वाद्याच्या नादात, मोठ्या जल्लोषात गणपतीचं आगमन झाले. घरात, सार्वजनिक मंडळात बाप्पाची विधीवत स्थापना करण्यात आली. जगात गणपती बाप्पाची विविध मंदिरं आहेत. विविध संस्कृतीत गणपतीचा उल्लेख सापडतो. केवळ भारतातच नाही तर जगातील कानाकोपऱ्यात बाप्पाची मूर्ती सापडते. पण ही मूर्ती सर्वात वेगळी आहे. कारण या मूर्तीला डोकंच नाही, शीर नसलेली केवळ धड असलेली ही गणेशाची मूर्ती जगात एकमेव असल्याचा दावा करण्यात येतो. या बाप्पाच्या दर्शनासाठी दूरदूरुन भाविक भक्त हजेरी लावतात.
मुंडकटिया गणेश मंदिर
गणपती बाप्पाच्या या मंदिराचे नाव पण तसेच आहे. या मंदिराला मुंडकटिया म्हणजे मुंडकं नसलेला बाप्पा असंच नाव आहे. हे बाप्पा उत्तराखंडमधील देवभूमीत विराजमान आहेत. गौरीकुंडजवळ हे प्रसिद्ध मंदिर आहे. या ठिकाणी विना डोकं असलेल्या केवळ धड असलेल्या बाप्पाचं पुजन केलं जातं. भाविकांची मोठी गर्दी असते. हे मंदिर केदारनाथच्या मार्गावर असल्याने येथे रोज भाविकांची वर्दळ असते. या भागावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. त्यामुळे येथील सौंदर्य न्याहळतच राहावे वाटते.
काय आहे ती पौराणिक कथा
या ठिकाणचे स्थान महात्म्य सांगणारी कथा ही शिव पुराणात सांगण्यात आली आहे. त्यानुसार, माता पार्वतींनी त्यांच्या शरीराच्या मळापासून एक बालक तयार केले. त्यात प्राण फुंकले. त्यांनी या बालकाला त्यांच्या महालाच्या दरवाजावर उभे केले आणि कुणालाही आत न येऊ देण्याची ताकीद दिली. त्या दरम्यान भगवान शंकर त्याठिकाणी आले. ते महालात प्रवेश करणार तोच या बालकाने त्यांना अडवले. त्यावर क्रोधीत होत त्यांनी हातातील त्रिशुलाने गणपतीचे डोके उडवले.
जेव्हा माता पार्वतीला ही घटना कळली, त्या अत्यंत व्यथीत झाल्या. त्यांनी भगवान शंकराला त्या बालकाला पुन्हा जीवित करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर शंकराने त्या मुलाच्या धडावर गणपतीचे डोके लावले. त्याला जीवदान दिले. हा बालक म्हणजे गणपती अशी मान्यता आहे. तर जिथे भगवान शंकराने गणपतीचे डोके वेगळे केले, तिथेच हे मुंडकं नसलेले गणपती मंदिर असल्याचा दावा करण्यात येतो. त्याला नावही तसंच दिलं आहे.
डिस्क्लेमर: सर्वसामान्य आणि धार्मिक मान्यता आधारीत माहिती. टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही.
