Vastu Shastra : घराची सजावट करताना कृत्रिम फुलं वापरावीत का? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे तुम्हाला तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष दूर करण्यास मदत करते, वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होऊ शकते, अशाच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

घराची सजावट करताना फुलांना प्रचंड महत्त्व आहे, अगदी पूर्वीच्या काळापासून ते आता आधुनिक काळापर्यंत सर्वच जण फुलांचा वापर करतात. आपण अनेकदा पाहीलं असेल अनेक जण आपल्या घराशेजारी एखादी सुंदर बाग तयार करतात. त्या बागेत असलेली रंगी बेरंगी फुलं घराची शोभा वाढवतात. तसेच अनेकजण शुभ कार्याप्रसंगी घराला फुलं आणि अंब्याच्या पानांची तोरणं लावतात, घर फुलांच्या माळांनी सजवलं जातं. देवी, देवतांना पूजा करताना फुलं वाहिली जातात, फुलांचे हार देखील घातले जातात. फुलांच्या सुवासाने संपूर्ण घर दरवळून जातं. मात्र अलिकडच्या काळात आता सर्वत्र कृत्रिम फुलं देखील मिळू लागली आहे, याचा एक फायदा म्हणजे ही फुल दीर्घकाळ टिकतात कारण ते कृत्रिम असतात. मात्र ताजी खरी फुलं ही लवकर खराब होतात, ते जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस किंवा एखादा आठवडा टिकू शकतात. मात्र कृत्रिम फुलं ही वर्षानुवर्ष टिकतात. त्यामुळे आता अनेक जण आपल्या घराच्या सजावटीसाठी अशाच फुलांचा वापर करतात, परंतु अशा फुलांचा वापर करणं योग्य आहे का? वास्तुशास्त्र काय सांगतं? चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात.
वास्तुशास्त्रानुसार घराची सजावट करताना कधीही कृत्रिम फुलं वापरू नये, एखाद्या विशेष प्रसंगी कधीतरी वापरले तर चालतील. परंतु रोजच्या सजावटीमध्ये किंवा घराला तोरण बांधताना किंवा देवघराच्या सजावटीमध्ये कृत्रिम फुलं नसावीत. त्यासाठी नेहमी बागेत मिळणारी किंवा बाजारातून आणलेली ताजी फुलंच वापरावीत. कारण कृत्रिम फुलं ही कृत्रिमच असतात, त्यांना सुगंध नसतो, त्यामुळे अशी फुलं देवघराच्या सजावटीमध्ये वापरू नयेत, असं वास्तुशास्त्र सांगतं.
तसेच तुम्ही तर तुमच्या घराच्या सजावटीमध्ये जास्तीत जास्त कृत्रिम फुलांचा वापर केला तर त्याचा परिणाम हा तुमच्या नात्यावर देखील होतो. घरात एक प्रकारचा कृत्रिमपणा येतो. घरातील जिव्हाळा प्रेम कमी होतं, त्यामुळे घराची सजावट करताना कृत्रिम फुलं वापरू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
एवढंच नाही तर तुम्ही जेव्हा तुमचं घर सजवण्यासाठी कृत्रिम फुलांचा वापर करता, तेव्हा त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, घरातील सकारात्मक ऊर्जेवर त्याचा मोठा परिणाम होतो, जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, तेव्हा त्याचा परिणाम हा फक्त तुमच्या एकट्यावरच होत नाही तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो, घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, आजारपण वाढतं, हातात आलेला पैसा टिकत नाही, सर्व व्यवहारांमध्ये एक प्रकारची कृत्रिमता निर्माण होते, त्यामुळे कृत्रिम फुलांचा वापर टाळावा असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
