Akash Deep : ‘तिला कॅन्सर आहे, सतत डोळ्यासमोर चेहरा यायचा…’ आकाश दीपने सर्वांपासून दु:ख लपवलं, मग एजबेस्टमध्ये रचला इतिहास
Akash Deep : टीम इंडियाच्या इंग्लंडवरील मोठ्या विजयात जेवढं योगदान दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकवणाऱ्या शुबमन गिलच आहे, तेवढच आकाश दीपच सुद्धा आहे. या सीरीजमध्ये आकाश दीप पहिलाच कसोटी सामना खेळत होता. पहिल्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवलेला. आता दुसरा कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधली आहे.

मागच्या 58 वर्षात जे एकदाही शक्य झालं नव्हतं, ते अखेर टीम इंडियाने साध्य करुन दाखवलय. टीम इंडियाने शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली एजबेस्टनच्या मैदानात इंग्लंडचा टेस्ट मॅचमध्ये दारुण पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपने. या टेस्टद्वारे टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या आकाश दीपने या मॅचमध्ये 10 विकेट घेऊन इतिहास रचला. या विजयानंतर आकाश दीपने जो खुलासा केला, त्यामुळे हा विजय त्याच्यासाठी किती खास आहे, ते लक्षात येतं. माझ्या बहिणीची कॅन्सरशी झुंज सुरु असून हा विजय तिच्यासाठी आहे, असं आकाशदीपने सांगितलं.
टीम इंडियातील सीनियर आणि इंग्लंडमध्ये अनेक टेस्ट मॅच खेळलेल्या चेतेश्वर पुजारासोबत एका खास इंटरव्यूमध्ये आकाश दीपने हा खुलासा केला. आकाश विजयानंतर बोलताना म्हणाला की, “मागच्या दोन महिन्यांपासून माझ्या बहिणीची कॅन्सरशी झुंज सुरु आहे. मॅच दरम्यान मला वारंवार तिची आठवण येत होती” “मी अजूनपर्यंत कोणाला सांगितलं नाही, मी हा विजय माझ्या बहिणीला समर्पित करतो. मागच्या दोन महिन्यांपासून तिची कॅन्सरशी झुंज सुरु आहे” असं आकाशदीप म्हणाला.
ती सर्वात जास्त आनंदी असेल
“सध्या बहिणीची तब्येत थोडी ठिक असल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केलं. तिची तब्येत थोडी ठीक आणि स्थिर आहे. माझ्या प्रदर्शनाने ती सर्वात जास्त आनंदी असेल. मागच्या दोन महिन्यात मानसिक दृष्टया तिने बरच काही सहन केलय. मी मैदानावर जेव्हा केव्हा चेंडू पकडायचो, तेव्हा माझ्या नजरेसमोर तिचा चेहरा यायचा. मला तिच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा होता. हा विजय मी तिला समर्पित करतो” असं आकाशदीप म्हणाला.
इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा आकाश दीप दुसरा भारतीय गोलंदाज
रविवारी 6 जुलैला एजबेस्टन टेस्टच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाने इंग्लंडला 271 धावांवर गुंडाळलं. 336 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आकाश दीपने टेस्टच्या अखेरच्या दिवशी 4 विकेट काढले. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने एकूण मिळून 6 विकेट्स काढले. पहिल्या इनिंगमध्ये आकाश दीपने 4 विकेट्स काढले होते. अशा प्रकारे 10 विकेट्स काढून त्याने आपल्या नावावर रेकॉर्ड नोंदवला. इंग्लंडमध्ये एका टेस्ट मॅचमध्ये 10 विकेट घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
