Ashes 2025 : पिंक बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कांगारूंचं कमबॅक, इंग्लंडचा टप्प्यात केला कार्यक्रम
पिंक बॉल टेस्ट सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ इंग्लंडने गाजवला होता. त्यामुळे इंग्लंड मजबूत स्थितीत दिसत होता. पण दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पूर्ण हवा काढून टाकली. इतकंच काय तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 44 धावांची आघाडी घेतली.

एशेज मालिकेतील दुसरा कसोटी सामना डे नाईट आहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्या संघाचा वरचष्मा असेल याकडे लक्ष लागून होतं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात 334 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंड मजबूत स्थितीत दिसत होता. कारण आतापर्यंत डे नाईट कसोटीच्या पहिल्या डावात 300 पार धावा करणारा संघ आरामात जिंकल्याचं पाहायला मिळालं आहे. पण ऑस्ट्रेलियाने चिवट खेळी करून इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं आहे. इंग्लंडने दिलेल्या 334 धावांचा दुसऱ्या दिवशी यशस्वी पाठलाग केला आहे. इतकंच काय तर धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे.
दुसऱ्या दिवशी काय झालं?
पहिल्या दिवशी इंग्लंडने 9 गडी गमवून 325 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी यात आणखी 9 धावांची भर पडली आणि शेवटची विकेट पडली. जो रूट 138 धावांवर नाबाद राहिला. तर जोफ्रा आर्चर 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी आला. इंग्लंडचा संघ आरामात 300 च्या आत त्यांना गुंडाळेल असं वाटत होतं. पण झालं भलतंच.. ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशीच 334 धावांचं आव्हान गाठून पुढे गेले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमवून 378 धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाने 44 धावांची आघाडी घेतली असून यात तिसऱ्या दिवशी आणखी भर पडेल यात काही शंका नाही. एलेक्स कॅरे नाबाद 46 आणि मायक नेसर नाबाद 15 धावांवर खेळत आहे.
ट्रेव्हिस हेड आणि जेक वेदराल्ड ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 77 धावांची भागीदारी केली. ट्रेव्हिस हेड 33 धावा करून बाद झाला. त्यानंतर जेक वेदराल्ड आणि मार्नस लाबुशेन यांची जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. जेक 72 धावा करून बाद झाला आणि स्टीव्हन स्मिथ मैदानात उतरला. त्यानेही अपेक्षित धावा केल्या. स्टीव्हन स्मिथने 85 चेंडूंचा सामना केला आणि 61 धावा केल्या. कॅमरून ग्रीनने 45 आणि जोश इंग्लिसने 23 धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने सर्वाधिक 3 गडी बाद केले, तर बेन स्टोक्सने 2 आणि जोफ्रा आर्चरला एक विकेट मिळाली.
