BBL 15: स्टीव्ह स्मिथ आणि बाबर आझमच्या संघाची अंतिम फेरीची संधी हुकली, आता असं असेल गणित
बिग बॅश लीग स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील बाद फेरीचे सामने सामने सुरु झाले आहेत. या स्पर्धेत सिडनी सिक्सर्स संघाची थेट अंतिम फेरी गाठण्याची संधी हुकली. तर पर्थ स्कॉर्चर्सने अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. अजूनही सिडनी सिक्सर्सला संधी आहे. कसं ते समजून घ्या.

बिग बॅश लीग स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 सामना पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात पार पडला. या सामन्यातील विजयी संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळालं. तर पराभूत झालेल्या संघाला आणखी एक संधी मिळाली आहे. पर्थ स्कॉर्चर्सने अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. तर सिडनी सिक्सर्स क्वॉलिफायर 2 फेरीत होबार्ड हरिकेन्स आणि मेलबर्न स्टार्स या सामन्यातील विजयी संघाशी लढत करणार आहे. क्वॉलिफायर 2 चा सामना 23 जानेवारीला होणार आहे. क्वॉलिफायर 1 सामन्यात सिडनी सिक्सर्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला होता. मोइसेस हेन्रिक्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 गडी गमवून 147 धावा केल्या. तसेच विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना सिडनी सिक्सर्सने 99 धावांवरच नांगी टाकली. 20 षटकही पूर्ण खेळले नाही. अवघ्या 15 षटकात सिडनी सिक्सर्सचा डाव आटोपला.
सिडनी सिक्सर्सकडून स्टीव्ह स्मिथ वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. स्टीव्ह स्मिथने 24 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकार मारत 37 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज 20 हा आकडा गाठू शकला नाही. बाबर आझम आणि जॅक एडवर्ड्सला खातंही खोलता आलं नाही. तर चार फलंदाज एकेरी धावांवर राहीले. यावरून पर्थ स्कॉर्चर्सच्या भेदक गोलंदाजीचा अंदाज येतो. महली बियर्डमनने 3, कूपर कॉनोलीने 2, डेव्हिड पेनने 2, झाय रिचर्डसनने 1 आणि आरोन हार्डीने 1 विकेट काढली.
पर्थ स्कॉर्चर्सकडून फिन एलनने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. त्याने 4 षटकार आणि 2 चौकार मारले. त्याच्या खेळीमुळे पर्थ स्कॉर्चर्सने 147 धावांपर्यंत मजल मारली. त्याच्या या खेळीमुळे सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. फिन एलन या पुरस्कारानंतर म्हणाला की, ‘आमच्याविरुद्ध चांगली गोलंदाजी केली आणि मला वाटते की आमच्या मुलांनी त्यांच्यापेक्षा चांगली गोलंदाजी केली. आम्ही तिथे धावा काढणे किती कठीण आहे हे दाखवून दिले. मला वाटते की स्टीव्हन स्मिथ सध्या या जगातून बाहेर फलंदाजी करत आहे. तो कदाचित एकमेव असा आहे की त्याला काही फरक पडत नाही. म्हणून मला वाटते की, संपूर्ण गोलंदाजीच्या हल्ल्यात दाखवून दिलं की आपण काहीही करू शकतो. ‘
