अगोदर समलैंगिक असल्याची कबुली, आता बहिणीवर सनसनाटी आरोप

  • टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 21:30 PM, 21 May 2019
अगोदर समलैंगिक असल्याची कबुली, आता बहिणीवर सनसनाटी आरोप

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 मीटरमध्ये विक्रम करणारी आणि आशियायी स्पर्धेत 2 रौप्य पदक जिंकणारी स्टार महिला धावपटू दुती चंदने आपल्या बहिणीविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझी बहिण मला ब्लॅकमेल करत आहे, असा सनसनाटी आरोप दुतीने केला.

दुती चंद म्हणाली, “माझी बहिण मला ब्लॅकमेल करत आहे. तिने माझ्याकडे 25 लाख रुपयांची मागणी केली. तिने मला एकदा मारहाणही केली होती. त्यानंतर मी याची माहिती पोलिसांनाही दिली होती. ती मला ब्लॅकमेल करत होती, त्यामुळे मला नाईलाजाने माझ्या खासगी नात्याविषयीही बोलावे लागले.”

समलैंगिक असल्याचे सार्वजनिकपणे मान्य करणारी पहिलीच भारतीय खेळाडू

ओडिशाच्या चाका गापालपूरमध्ये जन्मलेल्या दुतीने मागील वर्षी आशियायी स्पर्धेत भारताला 2 रौप्य पदके मिळवून दिली. सध्या तिचे लक्ष्य 2020 च्या टोकियोतील ऑलम्पिक स्पर्धेवर आहे. याआधी दुती चंदने आपल्या लैंगिकतेविषयी मोठा खुलासा करत आपण समलैंगिक असल्याचे सार्वजनिकपणे मान्य केले. 23 वर्षीय दुती समलैंगिक असल्याचे सार्वजनिकपणे मान्य करणारी पहिलीच भारतीय खेळाडू आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाच्या लैंगिकतेविषयी दिलेल्या निर्णयाने विश्वास मिळाला’

मागील 3 वर्षांपासून माझे एका मुलीसोबत संबंधत आहेत. मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने लैंगिकतेविषयीच्या निर्णयानंतर आम्हाला विश्वास आला की आम्ही चुकीचे नाही, असे मत दुतीने व्यक्त केले होते. दुती म्हणाली होती, ‘सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 वर निर्णय देत त्याला असंवैधानिक घोषित केले. त्यावेळी आम्हाला सोबत राहण्यात आता कोणताही धोका नसल्याची जाणीव झाली. आम्ही लग्नाचा निर्णय घेतला असून एक छोटेसे कुटुंब म्हणून जगणार आहोत.’

दुतीने आपल्या जोडीदारविषयी बोलताना म्हटले, “ती माझ्या शहरातीलच आहे. तिलाही खेळ आवडतो. मी खेळात करिअर करण्यासाठी किती अडचणींना तोंड दिले हे तिने वाचले होते. तिलाही माझ्याकडून प्रेरणा मिळाल्याचेही तिने मला सांगितले. तेव्हाच आमची भेट झाली.”

‘खेळानंतर मलाही माझे खासगी आयुष्य जगायचे आहे’

दुतीने आपल्या जोडीदाराचे नाव आत्ताच सार्वजनिक न करण्याचाही निर्णय घेतला आहे. दुती म्हणाली, मला माझे आयुष्य माझ्या इच्छेप्रमाणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळेच मी माझ्या समलैंगिकतेविषयी माहिती सार्वजनिक केली. आम्ही जे करत आहोत, तो काही गुन्हा नाही. हे आमचं आयुष्य आहे. ते आम्ही आम्हाला हवं तसं जगू. मी आज देशासाठी खेळत आहे म्हणून लोकांमध्ये चर्चेत आहे. मात्र, खेळानंतर मलाही माझे खासगी आयुष्य जगायचे आहे.”

‘एकमेकांसोबत राहण्यासाठी अजिबात पुरेसा वेळ मिळत नाही’

आपल्या जोडीदारच्या सहकार्याविषयी दुती म्हणाली, “ती माझ्यासोबत मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकलेली नाही. मात्र, जेव्हा मी खेळते, तेव्हा ती माझ्यासाठी नेहमी प्रार्थना करते. आम्हाला दोघींना एकमेकांसोबत राहण्यासाठी अजिबात पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, तरिही ती नेहमी माझ्या पाठिशी उभी राहते.”

‘आई बाबा माझं हे नातं समजून घेतील’

ही गोष्ट अजून आईबाबांनाही सांगायची आहे, असंही दुतीने नमूद केले. ती म्हणाली, “मी मोठ्या काळापासून देशासाठी खेळत आहे. आतापर्यंत मी जे काही केले त्यावर मी खूश आहे आणि आईबाबा देखील खूश आहेत. ते माझं हे नातंही समजून घेतील, अशी मला आशा आहे.”