न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेपूर्वी मोहम्मद शमीला मोठा धक्का, थेट निवडणूक आयोगाची नोटीस? SIR फॉर्ममध्ये मोठी गडबड
न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी मोहम्मद शमीची निवड झाली आहे, मात्र त्यापूर्वीच त्याला मोठा धक्का बसला आहे, समोर आलेल्या माहितीनुसार त्याला निवडणूक आयोगाकडून नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, भारताचा स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीला निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ मोहम्मद कैफ यांच्या SIR फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता दोघांनाही निवडणूक आयोगानं कार्यालयात बोलावलं आहे. मात्र अद्याप या वृत्ताला मोहम्मद शमी किंवा निवडणूक आयोगाकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. मिडिया रिपोर्टनुसार मोहम्मद शमीच्या एन्यूमरेशन फॉर्ममध्ये प्रोजेनी मॅपिंग तसेच सेल्फ-मॅपिंगशी संबंधित काही त्रूटी आढळून आल्या आहेत. हा प्रकार निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्यानंतर आता साऊथ कोलकाताच्या वार्ड नंबर 93 कडून मोहम्मद शमीला नोटीस जारी करण्यात आली आहे, त्याला सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता शमीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मोहम्मद शमीची कोलकाता महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 93 मध्ये मतदार म्हणून नोंदणी आहे. हा महानगर पालिकेचा प्रभाग रासबिहारी विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. तर 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोहम्मद शमीने आपल्या वडिलांचं गाव असलेल्या उत्तर प्रदेशातील अमरोहमध्ये मतदान केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये SIR ची प्रक्रिया पार पडली, त्यानंतर 16 डिसेंबर रोजी तब्बल 58.21 लाख लोकांचं नाव मतदार यादीमधून कट करण्यात आलं आहे, त्यावर सध्या हारकती मागवण्यात आल्या आहेत.
इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार मोहम्मद शमी आज झालेल्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीला उपस्थित राहू शकला नाही, कारण तो सध्या विजय हजारे ट्रॉफी खेळत असून, त्यासाठी तो राजकोटमध्ये आहे. तो पश्चिम बंगालचं प्रतिनिधित्व करत आहे. दरम्यान आता यावर पुढील सुनावणी 9 ते 11 जानेवारी रोजी होणार असून, त्यासाठी त्याला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मोहमद शमीची निवड ही 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड विरोधातील तीन वनडे आणि 5 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी झाली आहे. त्यापूर्वी त्याला आता निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे. त्याला हजर होण्यास सांगण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे.
