IND vs NZ : ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंचं एकमेकांशी पटत नाही का? शुबमन गिल म्हणाला…
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला. यावेळी त्याला ड्रेसिंग रूममधील वातावरण कसं आहे याबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने सांगितलं की...

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा मानस असेल. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या कर्णधाराची पत्रकार परिषद पार पडली. या सामन्यातील रणनिती आणि इतर प्रश्नांचा त्याच्यावर भडिमार झाला. यावेळी त्याला सर्वात तिखट आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेला प्रश्न विचारला गेला. ड्रेसिंग रूममधील वातावरण कसं आहे? स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत ड्रेसिंग रूममधील वातावरण कसं आहे? या प्रश्नांचं उत्तर शुबमन गिलने एका वाक्यात दिलं. ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगलं असल्याचं सांगितलं. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भारतीय क्रिकेटप्रती असलेल्या वचनबद्धतेचे कौतुक केले.
शुबमन गिलने सांगितलं की, ‘मला वाटते की संघातील वातावरण खूप चांगलं आहे. ज्या खेळाडूंचं तुम्ही नाव घेतलं ते दशकांपासून अशा वातावरणात आहेत. असेच लोकं कायम भारतीय क्रिकेट संघाला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असतात. मागच्या मालिकेतही तुम्ही पाहीलं असेल की, त्यांनी किती चांगली कामगिरी केली. यासाठी मला वाटते की टीममध्ये चांगलं वातावरण आहे.’ दरम्यान, कर्णधार शुबमन गिलच्या फॉर्मची चिंता त्याच्या चाहत्यांना सतावत आहे. मागच्या काही सामन्यात त्याला फार काही करता आलं नाही. विजय हजारे ट्रॉफीतही चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरला. आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.
शुबमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या सुमार कामगिरीवरही भाष्य केलं. कसोटी क्रिकेटमधील वाईट कामगिरीसाठी व्यस्त वेळापत्रकाला दोषी धरलं. भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी चांगली राहिली नाही. देशात खेळलेल्या कसोटी मालिकेतही पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मागच्या 12 महिन्यात टीम इंडियाने दोन महत्त्वाच्या कसोटी मालिका गमावल्या. दोन्ही मालिकांमध्ये व्हाईट वॉश मिळाला हे सर्वात वाईट होतं. न्यूझीलंडने भारताला 3-0ने आणि दक्षिण अफ्रिकेने भारताला 2-0 ने पराभूत केलं. भारताने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकाही 1-4 ने गमावली.
