SL vs PAK: फायनलमध्ये पाकिस्तानला त्यांचा हिरो मोहम्मद रिजवाननेच बुडवलं, ‘ही’ आहेत पराभवाची 5 कारणं
SL vs PAK: आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या देशवासियांना श्रीलंकन टीमने काल विजयी भेट दिली. जवळपास आठ वर्षानंतर श्रीलंकेची टीम पुन्हा एकदा आशियाई चॅम्पियन बनली आहे.

मुंबई: आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या देशवासियांना श्रीलंकन टीमने काल विजयी भेट दिली. जवळपास आठ वर्षानंतर श्रीलंकेची टीम पुन्हा एकदा आशियाई चॅम्पियन बनली आहे. आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकन टीमने पाकिस्तानला 23 धावांनी हरवलं. 2014 नंतर श्रीलंकन संघाने पहिल्यांदा विजेतेपद मिळवलं. त्यांच हे सहाव जेतेपद आहे. ग्रुप राऊंडमध्ये त्यांचा फक्त अफगाणिस्तानकडून पराभव झाला. सुपर 4 मधील सर्व सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला.
पाकिस्तानची टीम या स्पर्धेत चांगली खेळली. फायनलाधी सुपर 4 मध्येही श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. फायनलमध्येही तोच रिझल्ट दिसून आला. पाकिस्तानी टीमने फायनलमध्ये अनेक चुका केल्या. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये 100 टक्के परफेक्शन दिसलं नाही.
- पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम फायनलमध्ये अपयशी ठरला. त्याने केवळ पाच धावा केल्या. श्रीलंकेने त्याला लवकर पॅव्हेलियनमध्ये धाडलं. त्यामुळे डावाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानी टीमवर दबाव आला.
- मोहम्मद रिजवानशिवाय कुठलाही दुसरा पाकिस्तानी फलंदाज चालला नाही. टीममध्ये केवळ तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. सात फलंदाज 10 पेक्षा कमी धावसंख्येवर आऊट झाले.
- रिजवानने सुद्धा धीम्यागतीने फलंदाजी केली. त्याने 49 चेंडूत 55 धावा केल्या. फक्त एक सिक्स त्याने मारला. 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीमला त्याच्याकडून धमाकेदार सुरुवातीची अपेक्षा होती.
- पाकिस्तानने खूपच खराब फिल्डिंग केली. हॅरिस रौफच्या 18 व्या ओव्हरमध्ये भानुका राजपक्षेची कॅच सोडली. शेवटच्या ओव्हरमध्ये शादाब आणि आसिफ कॅच पकडताना धडकले. भानुका राजपक्षेला दोन जीवनदान मिळाली. त्यानंतर त्याने 45 चेंडूत 71 धावा फटकावल्या.
- पाकिस्तानी टीमला वानिंदु हसरंगाचा सामना करता आला नाही. हसरंगाने आधी बॅटने कमाल केली. त्याने 21 चेंडूत 36 धावा फटकावल्या. त्यानंतर गोलंदाजीतही त्याने आपली जादू दाखवली. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 14 धावा दिल्या. पण नंतर एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन बाजी पलटवली.
