IND vs PAK : दोन्ही आपलेच…, महामुकाबल्याआधी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाचं भारताला आव्हान
Asia Cup 2025 India vs Pakistan : आशिया कप 2025 स्पर्धेत प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळणार आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे भारतीय-पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. या सामन्याआधी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेचा श्रीगणेशा 9 सप्टेंबरपासून होणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे 14 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्याकडे होतं. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबरला सामना नियोजित आहे. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातून या सामन्याला तीव्र विरोध होता. त्यामुळे हा सामना होणार की नाही? याबाबत अनिश्चितता होती. मात्र काही दिवसांपूर्वी भारतीय क्रीडा मंत्रालयाने हा मुकाबला होणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे 2 कट्टर प्रतिस्पर्धी या स्पर्धेत भिडणार असल्याचं निश्चित झालंय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात कायमच थरार पाहायला मिळाला आहे. यंदाही आशिया कप निमित्ताने चाहत्यांना चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ याने असं काही म्हटलं ज्याची चर्चा पाहायला मिळत आहे. पाकिस्तान टीम इंडिया विरुद्धचे दोन्ही सामने जिंकणार असल्याचा विश्वास हरिसने व्यक्त केला आहे. हरिसचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीम आशिया कप 2025 स्पर्धआधी दुबईत सराव करत आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात 2 सामने होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. यावरुन हरिसने प्रतिक्रिया दिली. “दोन्ही (सामने) आपलेच आहेत, इंशाअल्लाह”, असं हरिसने म्हटलं.
भारत-पाकिस्तान ए ग्रुपमध्ये
आशिया कप स्पर्धेसाठी या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. साखळी फेरीत दोन्ही गटातील अव्वल 2 संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. सुपर 4 मधून 2 अव्वल संघ अंतिम फेरीत पोहचतील. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात 2 सामने होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही संघ फायनलमध्ये पोहचल्यास सामन्यांचा आकडा 2 वरुन 3 होईल.
टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ
यंदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्याची तिसरी वेळ आहे. टी 20 आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 3 सामने झाले आहेत. भारताने त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने एकदा विजय मिळवला आहे. तसेच वनडे फॉर्मेटने झालेल्या आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने 8 सामने जिंकले आहेत. तर भारताने 7 वेळा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे.
दरम्यान यंदा सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर सलमान अली आगाह याच्या खांद्यावर पाकिस्तानची धुरा आहे. टीम इंडिया रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदाच टी 20I आशिया कप स्पर्धा खेळत आहेत. तर पाकिस्तानने मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या अनुभवी जोडीचा समावेश केला नाही. त्यामुळे दोन्ही संघ या 2 अनुभवी खेळाडूंशिवाय कशी कामगिरी करतात? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
