India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान टी-20 सामना रद्द? काय घडलं सुप्रीम कोर्टात?

PIL Against India Pakistan Cricket Match : पहिल्याच सामन्यात भारताने बुधवारी दुबई येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर कमाल केली. यजमान संयुक्त अरब अमिरातला 9 गडी बाद करत लोळवले. पण पाकिस्तानविरुद्ध सामन्याबाबत अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत.

India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान टी-20 सामना रद्द? काय घडलं सुप्रीम कोर्टात?
सामना रंगणार का?
| Updated on: Sep 11, 2025 | 8:38 AM

Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तान सामना रद्द व्हावा अशी तमाम भारतीयांची आणि राष्ट्रवाद शिकवणाऱ्यांची माफक अपेक्षा होती. पहलगाम हल्ल्याच्या जखमा ताज्या असताना हा भाईचारा कशासाठी असा सवाल विरोधकही करत आहेत. आशिया कपमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारताचा पाकड्यांसोबत सामना होत आहे. केंद्र सरकारने कोणतीच स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने अखेर भारत-पाक सामना रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उर्वशी जैन हिच्या नेतृत्वात चार विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ही लोकहितवादी याचिका दाखल केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतरही हा सामना का खेळवण्यात येत आहे असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे.

सामना नागरिकांच्या बलिदानापेक्षा मोठा आहे का?

आशिया कपमधील भारत-पाकचा सामना हा नागरिकांच्या बलिदानापेक्षा मोठा आहे का? असा सवाल करण्यात आला आहे. क्रिकेट राष्ट्रीय हितापेक्षा मोठे नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा 2005 च्या अंमलबजावणीसाठी ही याचिकेत निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. वकील स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांनी दाखल केली आहे.

आता सुप्रीम कोर्टानेच कान टोचावे

भारत आणि पाकिस्तान हा हायप्रोफाईल आणि हाय टेन्शन सामना असतो. हा क्रिकेट जगतातील सर्वात अटीतटीचा सामना असतो. त्यामाध्यमातून खोऱ्याने जाहिराती गोळा करण्यात येतात. मोठा महसूल प्राप्त होतो. उत्पन्न आणि कमाई करता येते. आशिया कप हा सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये केंद्र बिंदू झाला आहे. या सामन्याच्या आयोजनामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकांच्या राष्ट्रीय भावना दुखावल्या जात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. 14 सप्टेंबरपूर्वीच या सामन्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

भारताने UAE ला 9 गड्यांना बाद करत लोळवले

भारताने आशिया कपमध्ये दमदार एंट्री केली. सुरुवातीच्या पहिल्याच सामन्यात युएई संघाला टीम इंडियाने धुवून काढले. बुधवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये संयुक्त अरब अमिरात संघाला 9 गड्यांनी भारताने नमवले. डावखूरा फिरकीपटू कुलदीप यादव याने 4/7 अशी जादू केली. तर ऑलराऊंडर शिवम दुबेने 3/4 विकेट घेतल्या. युएई 13.1 षटकात केवळ 57 धावांवर गुंडळला गेला. भारताने 4.3 षटकात हा सामना खिशात टाकला.