Asia Cup 2025 स्पर्धत अभिषेक शर्मासह ओपनिंग कोण करणार? तिघांची नावं आघाडीवर
Asia Cup 2025 Team India : एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काउन्सिलने काही दिवसांपूर्वी बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. तेव्हापासून भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? कुणाला संधी मिळणार? याची प्रतिक्षा आणि उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्याची यशस्वी सांगता केली. भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपली पहिली मालिका बरोबरीत सोडवली. उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली. त्यानंतर आता भारतीय संघ थेट 1 महिन्यानंतर मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. यंदा आशिया कप स्पर्धचं टी 20i फॉर्मेटनुसार आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीला खेळता येणार नाही. ही अनुभवी जोडी 2023 आशिया कप स्पर्धेत खेळली होती. तेव्हा वनडे फॉर्मेटनुसार सामने खेळवण्यात आले होते.
आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. मात्र त्यानंतरही ही स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. एकूण 8 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि ओमनाचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांग्लादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तान संघ आहेत.
भारतीय संघाची घोषणा केव्हा?
या स्पर्धेतीत साखळी फेरीत प्रत्येक संघ प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातील 2 अव्वल संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. त्यानंतर अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे.
क्रिकेट चाहत्यांना आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याची प्रतिक्षा लागून आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ऑगस्ट महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार असल्याने सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
ओपनिंग कोण करणार?
भारताचा युवा आणि विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ओपनिंग करत आहे. त्यात अभिषेक टी 20i मधील नंबर 1 फलंदाज आहे. त्यामुळे अभिषेक या स्पर्धेसाठी असणार, असं निश्चित म्हटलं जात आहे. त्यामुळे अभिषेकसोबत ओपनिंगला कोण येणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ही जोडी गेल्या अनेक महिन्यांपासून टी 20i क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे या दोघांचं आशिया कप स्पर्धेतून कमबॅक होऊ शकतं. तसेच साई सुदर्शन याचंही नाव चर्चेत आहेत. त्यामुळे या तिघांची निवड झाली तर अभिषेकला कुणाची साथ मिळणार? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
