AUS vs ENG 4th Test: बॉक्सिंग डे कसोटीत एकाच दिवशी पडल्या 20 विकेट, झालं असं की..
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी पहिला डाव आटोपला. एका दिवशी 20 विकेट पडल्याची घटना घडली. असं का झालं आणि फलंदाजांना गोलंदाजांना सामना करणं का अडचणीचं ठरलं जाणून घ्या.

बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी गाजवला. पहिल्याच दिवशी पहिल्या डावाचा खेळ संपला. अर्थात दोन्ही बाजूने एकूण 20 विकेट पडल्या. अनेकांना धडाधड विकेट पडत असल्याचं पाहून आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खूप साऱ्या धावा होतात. पण इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात फलंदाजांना फलंदाजी करणं कठीण गेलं. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी फक्त 75.1 षटकांचा खेळ झाला आणि एकूण 20 विकेट पडल्या.पहिल्यांदा फलंदाज करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 152 धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडला या धावांचा पाठलाग करताना 110 धावांपर्यंत मजल मारता आली. पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाला 42 धावांची आघाडी मिळाली. पहिल्याच दिवशी 20 विकेट पडल्याने 131 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला.
131 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. 94,119 लोकं मैदानात उपस्थित होते आणि त्यांनी धडाधड पडत असलेल्या विकेट्सचा आनंद लुटला. मेलबर्नच्या गवताळ खेळपट्टीवर तग धरणं कठीण गेलं. कोणताही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही. हॅरी ब्रूकने त्यातल्या 41 धावा केल्या. तर 13 फलंदाज असे होते की त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मेलबर्नच्या मैदानावर पहिल्याच दिवशी 20 विकेट पडल्याची घडामोड यापूर्वी 1894-95 मध्ये घडली होती. तेव्हा 198 धावांवर 20 पडल्या होत्या. त्यानंतर 131 वर्षांनी असा प्रकार घडला आहे. यावेळी 262 धावांवर 20 विकेट पडल्या आहेत.
खेळपट्टीवर 10 मिलीमीटरचं गवत!
मेलबर्नच्या खेळपट्टीवर 10 मिलीमीटर गवत आहे. त्यामुळे फलंदाजांना चेंडू पडल्यावर काय होईल याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. मागच्या सामन्यातील खेळपट्टीवर असलेल्या गवतापेक्षा हे 2-3 मिलिमीटर अधिक आहे. मागचा सामना या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलियात झाला होता. तेव्हा हा कसोटी सामना 5 दिवस चालला होता. मात्र यावेळी मेलबर्न क्यूरेटरने 10 मिलीमीटरचं गवत खेळपट्टीवर ठेवलं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे टॉप 4 फलंदाज फक्त 13 धावा करू शकले. मेलबर्नची खेळपट्टी पाहून माजी क्रिकेटपटू मार्क वॉने नाराजी व्यक्त केली आहे. खेळपट्टी गोलंदाजांना खूपच मदत करत असल्याचं त्याने सांगितलं.
