Odi Retirement : वनडेत द्विशतक करणाऱ्या दिग्गजाकडून निवृत्तीचा निर्णय, टीमला मोठा झटका
Odi Cricket Retirement : क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गज क्रिकेटरने तडकाफडकी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. जाणून घ्या सविस्तर.

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. मॅक्सवेल याची एकदिवसीय कारकीर्द 13 वर्षांची राहिली. मॅक्सवेलने या 13 वर्षांच्या वनडेत कारकीर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. मॅक्सवेल 2 वेळा वर्ल्ड कप विजयी संघाचा भाग राहिला. ऑस्ट्रेलियाने 2015 आणि 2013 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला. मॅक्सवेल त्या संघाचा भाग होता. मॅक्सवेलने 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना ऐतिहासिक द्विशतक झळकावलं होतं. विजयी धावांचा पाठलाग करताना वनडेत द्विशतक करणारा मॅक्सवेल हा एकमेव फलंदाज आहे. मात्र आता त्याने वनडे क्रिकेटला अलविदा केलाय.मात्र टी 20I क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं या दिग्गज खेळाडूने स्पष्ट केलंय.
ग्लेन मॅक्सवेलची एकदिवसीय कारकीर्द
ग्लेन मॅक्सवेल याने 25 ऑगस्ट 2012 रोजी अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं. तर 4 मार्च 2025 रोजी मॅक्सवेलने टीम इंडिया विरुद्ध खेळलेला सामना हा त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील शेवटचा सामना ठरला. ग्लेनने एकूण 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये 126.71 च्या स्ट्राईक रेटने आणि 33.81 अशा सरासरीने एकूण 3 हजार 990 धावा केल्या. मॅक्सवेलने या दरम्यान 382 चौकार आणि 155 षटकार लगावले. तसेच मॅक्सवेलने 23 अर्धशतकं, 4 शतकं आणि 1 ऐतिहासिक द्विशतकही झळकावलं.
मॅक्सवेलचं अविस्मरणीय नाबाद द्विशतक
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत 7 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद द्विशतक झळकावलं होतं. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाची प्रत्युत्तरात 7 बाद 91 अशी स्थिती झाली होती. मात्र ग्लेन मॅक्सवेल याने इथून सामना फिरवला आणि ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅक्सवेलने दुखापत असूनही जागेवर उभे राहून फटकेबाजी केली आणि ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅक्सवेलने 128 चेंडूत 10 षटकार आणि 21 चौकारांच्या मदतीने नाबाद 201 धावांची ऐतिहासिक खेळी केली.
मॅक्सवेल निवृत्तीबाबत काय म्हणाला?
ग्लेन मॅक्सवेलने निवृत्तीबाबत चीफ सिलेक्टर जॉर्ज बेली यांना आधीच कल्पना दिली होती. मॅक्सवेलने फेब्रुवारी-मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळू शकत नाही, हे सांगितलं होतं. “मी त्याच वेळी सांगितलं होतं की मी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेत खेळू शकणार नाही”, असं एका पॉडकास्टद्वारे स्पष्ट केलं होतं.
“मला वाटतं की आता माझ्या जागी इतर खेळाडूंना संधी देण्यासाठी योजना आखण्याची वेळ आली आहे. त्यांनी त्यावर काम करायला हवं. तसेच 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये त्या जागेसाठी दावा करण्याचा प्रयत्न खेळाडूंनी करायला हवा. मला आशा आहे त्या जागेसाठी प्रबळ खेळाडू मिळेल जो यशस्वीपणे भूमिका बजावेल”, असंही मॅक्सवेलने म्हटलं.
