वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटपटूला कर्करोग, सर्जरीमुळे वेदना असह्य; पोस्ट करत म्हणाला..
वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला कर्करोग झाल्याचं निदान झाल्याने खळबळ उडाली होती. त्याला त्वचेचा कर्करोग झाला असून सहाव्यांदा शस्त्रक्रिया करावी लागली. या वेदनेनंतर त्याने सोशल मीडियावर आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार मायकल क्लार्क कर्करोगाशी झुंज देत आहे. मायकल क्लार्क आता 44 वर्षांचा असून 2015 वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार होता. क्रिकेट कारकिर्दीदरम्यान त्याला कर्करोग असल्याचं कळलं होतं. 2006 मध्ये पहिल्यांदा कर्करोग असल्याचं कळून आलं. कर्करोग असल्याचं कळल्यानंतर त्याच्या पायाखालची वाळू सरकली. पण मागच्या दहा वर्षात त्याच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. त्वचेचा कर्करोग असल्याचं निदान झाल्यानंतर सहाव्यांदा शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. 2019 मध्ये कपाळावरील तीन गाठींवर शस्त्रक्रिया केली गेली. त्यानंतर 2023 मध्ये छातीतून बेसल सेल कार्सिनोमा काढून टाकलं. तेव्हा त्याला 27 टाके घ्यावे लागले. आता त्याच्या नाकावरील एक गाठ काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्याने आपलं दु:ख सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. लोकांना याबाबत जागरूक करत म्हणालाी की, वेळोवेळी आरोग्याची तपासणी केली पाहीजे.
मायकेल क्लार्कने इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘त्वचेचा कर्करोग खरा आहे! विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये. आज माझ्या नाकावरून आणखी एक गाठ कापण्यात आली. तुमच्या त्वचेची तपासणी करून घेण्यासाठी एक मैत्रीपूर्ण आठवण करून देतो. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे पण माझ्या बाबतीत, नियमित तपासणी आणि लवकर निदान महत्वाचे आहे.’ ऑस्ट्रेलियात सूर्यकिरणांचा संपर्क अधिक होतो. त्यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता अधिक असते. अशा स्थितीत ठराविक कालावधीनंतर तपासणी करणं आवश्यक आहे.
View this post on Instagram
मायकल क्लार्क हा ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे.क्लार्क 2004 ते 2015 या कालावधीत ऑस्ट्रेलियासाठी 115 कसोटी, 245 वनडे आणि 34 टी20 सामने खेळला आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 74 कसोटी आणि 139 वनडे सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2013-14 मध्ये इंग्लंडला एसेज मालिकेत 5-0 ने पराभूत केलं होतं. तर 2015 वनडे वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला होता. क्लार्कने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवून दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. टी20 सामन्यांमध्ये 103च्या स्ट्राईक रेटने 488 धावा केल्या आहेत. क्लार्कने या फॉरमॅटमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे.आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सकडूनही खेळला आहे.
