
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. दोन्ही देशांनी या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली आणि वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं. पण असं असताना क गटात असलेल्या बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने नाटकी सुरू केली. भारतात क्रिकेट खेळण्यास बांगलादेशने नकार दिला. भारतात खेळणं असुरक्षित असल्याचं कारण पुढे केलं. इतकंच काय तर बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करावे असा आग्रह धरला. आयसीसीने या संदर्भात बांगलादेशसोबत वारंवार चर्चा केली. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काही केल्या तयार होत नव्हतं. अखेर आयसीसीने 16 सदस्यांचा यावर कौल घेतला. यात बांगलादेशच्या बाजूने फक्त दोन मतं पडली. या दोन मतात बांग्लादेश आणि पाकिस्तान हे दोन संघच होते. बाकीचे 14 मतं भारताच्या पारड्यात पडली. त्यामुळे आयसीसीने 14-2 ने भारताच्या बाजूने कौल दिला. तर श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही बांगलादेशचे सामने आमच्या देशात सुरक्षेच्या दृष्टीने कठीण असल्याचं सांगितलं. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आपल्याच जाळ्यात अडकलं आणि व्हायचं तेच झालं. बांगलादेशने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने गुरूवारी ढाक्यात एका बैठकीचं आयोजन केलं. यात बांगलादेशने स्पष्ट केलं की काही केलं तर भारतात टी20 वर्ल्डकप खेळणार नाही. बीसीबी अध्यक्षांनी सांगितलं की, ‘आयसीसीने आमचे सामने भारतातून हलवले नाहीत. आम्हाला जागतिक क्रिकेटबद्दल माहिती नाही आणि त्याची लोकप्रियता कमी होत आहे. आयसीसीने 20 कोटी लोकांना निराश केले आहे. क्रिकेट आता ऑलिंपिकमध्ये जात आहे, परंतु जर आपल्यासारखा देश तिथे जात नसेल तर ते आयसीसीचे अपयश आहे.’
आयसीसीने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतून बांगलादेशला काढलं आहे. त्या ऐवजी स्कॉटलँड संघाला स्पर्धेत संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बांगलादेशला ही स्पर्धा घरीच बसून पाहावी लागणार आहे. बांग्लादेश असलेल्या गटात आता स्कॉटलँड खेळणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील क गटात हा बदल केला गेला आहे. आता बांगलादेशची जागा स्कॉटलँड घेईल. या गटात इंग्लंड, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिज हे संघ आहे. स्कॉटलँडचे सुरूवातीचे तीन सामने कोलकात्यात होतील. तर शेवटचा साखळी फेरीचा सामना मुंबईत होणार आहे.