
टीम इंडिया नववर्षात 2026 मध्ये मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळणार आहे. दोन्ही संघांची ही नववर्षातील पहिलीच मालिका असणार आहे. न्यूझीलंडने या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. तर बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा केव्हा करणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा लागून आहे. अशात आता बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अंडर 19 टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने यौ दौऱ्यासाठी 15 खेळाडूंना संधी दिली आहे. अंडर 19 टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. उभयसंघात 3 ते 7 जानेवारी दरम्यान हे सामने खेळवण्यात येणार आहेत. भारताचा नियमित कर्णधार आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा या दोघांना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन बदलण्यात आला आहे.
आयुष म्हात्रे याच्या अनुपस्थितीत त्याचा ओपनिंग पार्टनर वैभव सूर्यवंशी अंडर 19 टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. तर एरॉन जॉर्ज याच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत. वैभवने स्वत:ला प्रत्येक फॉर्मेटमध्ये सिद्ध केलं आहे. वैभवने आयपीएल, अंडर 19, इंडिया ए, लिस्ट ए क्रिकेट, यूथ वनडे, यूथ टेस्ट आणि टी 20 या सर्व प्रकारात खोऱ्याने धावा केल्या आहेत. तसेच वैभवने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं होतं. मात्र आता वैभव कॅप्टन्सी कशी करतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिला सामना, 3 जानेवारी, विलोमूर पार्क
दुसरा सामना, 5 जानेवारी, विलोमूर पार्क
तिसरा सामना, 7 जानेवारी, विलोमूर पार्क
दरम्यान टीम इंडिया या मालिकेनंतर झिंबाब्वे आणि नामिबियात अंडर 19 वनडे वर्ल्ड कप खेळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका निर्णायक असणार आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी याचा बॅटिंगसह नेतृत्व करताना चांगलाच कस लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अंडर 19 टीम इंडिया : वैभव सूर्यवंशी (कर्णधार), एरॉन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन, युवराज गोहिल आणि राहुल कुमार.