ऑस्ट्रेलिया मालिका खेळण्यासाठी हा खेळाडू घेणार मोठी जोखीम, शस्त्रक्रियेशिवाय मैदानात उतरण्यास तयार!
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात संघाला गरज असताना ख्रिस वोक्स मोडलेल्या हातासह मैदानात उतरला होता. त्याच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक झालं आहे. आता पुन्हा एकदा ख्रिस वोक्स एक मोठी जोखीम घेण्याच्या तयारीत आहे.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. या मालिकेत अनेक विक्रम रचले गेले आणि मोडले गेले. दुसरीकडे, या मालिकेत अनेक खेळाडू दुखापतग्रस्तही झाले. पण संघासाठी काहीही करण्याची तयारी होती. ऋषभ पंत तर चौथ्या कसोटी सामन्यात बोटाला फ्रॅक्चर असूनही मैदानात उतरला होता. पाचव्या कसोटीत ख्रिस वोक्सकडून अशीच कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना ख्रिस वोक्सला दुखापत झाली. त्यामुळे तो गोलंदाजी करू शकला नाही. चौकार वाचवण्याच्या नादात त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे आता त्याला बरं होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. अस असताना ख्रिस वोक्सने एशेस मालिकेबाबत आपला हेतू स्पष्ट केला आहे. बीसीसी स्पोर्ट्सशी बोलताना वोक्स म्हणाला की, दुखापत किती गंभीर आहे हे पाहण्यासाठी मी वाट पाहात आहे. सर्जरी करावी लागेल आणि रिहॅबच्या माध्यमातून पुन्हा मजबूत करण्याची तयारी करावी लागेल.
ख्रिस वोक्स सर्जरीनंतर रिहॅबमध्ये जाण्याची शक्यता आहे. सध्या तो त्याच्या दुखापतीवर विचार करत आहे. याबाबत बोलताना ख्रिस वोक्स पुढे म्हणाला की, स्वाभाविकपणे ही दुखापत पुन्हा होण्याची शक्यता आहे. सर्जरीनंतर मैदानात पुन्हा परतण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल. हे एशेस दौऱ्यादरम्यान होणार आहे. पुनर्वसनामुळे तुम्ही आठ आठवड्यात मैदानात परतू शकता.’21 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या एशेस मालिकेसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी खांद्याच्या शस्त्रक्रियेऐवजी पुनर्वसनाचा मार्ग निवडू शकतो.
ख्रिस वोक्स एका हाताने फलंदाजीसाठी उतरला…
पाचव्या कसोटी सामन्यात संघाला अवघ्या काही धावांची गरज होती. तसेच शेवटची विकेट हातात होती. त्यामुळे ख्रिस वोक्स एका हाताने फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. पण त्याला काही स्ट्राईक मिळाली नाही. त्यात एक धाव घेताना त्याला वेदना असह्य झाल्या होत्या. भारताने या सामन्यात इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केलं. पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.
