
Ishan Kishan on Kirti Azad: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने देदिप्यमान कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी धोबीपछाड दिला आणि जेतेपद मिळवलं. या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. दुसरीकडे, जेतेपदाची ट्रॉफी मिळाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, हेड कोच गौतम गंभीर आणि आयसीसी चेअरमन जय शाह ट्रॉफी घेऊन मैदानाजवळ असलेल्या हनुमान टेकडी मंदिरात घेऊन गेले. यानंतर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. 1983 वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य किर्ती आझाद यांनी या प्रकारावर आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या इशान किशनची प्रतिक्रिया आली आहे.
किर्ती आझादने सांगितलं की, खेळ आणि ट्रॉफी कोणत्या एका धर्माची नसते. ही ट्रॉफी पूर्ण देशाची असते. संघात प्रत्येक धर्माचे खेळाडू आहेत. मग ट्रॉफी फक्त मंदिरातच का घेऊन गेले? मशिद, चर्च किंवा गुरूद्वारेत का घेऊन गेले नाहीत? किर्ती आझाद इतक्यावरच थांबले नाहीत तर टीम इंडिया ही काय सूर्यकुमार यादव किंवा जय शाह यांचं कुटुंब नाही. टीम इंडिया पूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करते आणि या संघात प्रत्येक धर्माचे खेळाडू आहेत. या वादग्रस्त टिकेनंतर टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज इशान किशनची प्रतिक्रिया समोर आली आहे. जेतेपद मिळवल्यानंतर पटणामध्ये घरी परतल्यानंतर मीडियाने याबाबत प्रश्न विचारले. तेव्हा इशान किशनचा संताप झाला.
इशान किशनने सांगितलं की, ‘आम्ही किती चांगला वर्ल्डकप जिंकला आहे. तुम्हीही काही चांगले प्रश्न विचारा. किर्ती आझाद यांनी काय बोलले आहे, त्यावर मी आता काय बोलू?’ इशान किशन यावर प्रतिक्रिया देण्यास टाळलं. पण त्याचा अर्थ सरळ असाच निघतो की, असे मुद्दे बाजूला ठेवा आणि ऐतिहासिक विजयावर फोकस करा. दरम्यान, इशान किशनचा टी20 वर्ल्डकपपूर्वी विचार केला गेला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला संघात स्थान मिळालं. त्या संधीचं इशान किशनने सोनं केलं. इशान या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताकडून दुसरा फलंदाज ठरला. इशान किशनने 9 सामन्यात 35.22 च्या सरासरीने 317 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.