Video : धोनी गंभीरमधला वाद संपुष्टात! कोलकाता विरुद्ध चेन्नई सामन्यानंतर काय झालं पाहा
आयपीएल 2024 स्पर्धेत बऱ्याच अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. एकमेकांचं तोंड न पाहणारे आज एकमेकांना मिठ्या मारत आहेत. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद संपुष्टात आला होता. आता महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर यांचं दृष्य पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेत 22 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा विजयी रथ रोखला. सलग तीन सामने जिंकणाऱ्या कोलकात्याला चौथ्या सामन्यात पराभवाची धूळ चारली. कोलकात्याने पहिल्या डावात 20 षटकात 9 गडी गमवून 137 धावा केल्या. विजयासाठी मिळालेल्या 138 धावा चेन्नई सुपर किंग्सने 17.4 षटकात तीन गडी गमवून पूर्ण केलं. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाबाद 67 धावांची खेळी खेळली. तर शिवम दुबेने 28 धावा केल्या. डेरिल मिचेल 25 धावा करून तंबूत परतला. गोलंदाजीत तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. असं एकंदरीत चित्र असताना सामन्याच्या शेवटी अनपेक्षित दृष्य प्रेक्षकांना बघायला मिळालं. एकमेकांमध्ये टोकाचा वाद असताना गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी एकत्र भेटले आणि काही मिनिटं चर्चाही केली.
सामना संपल्यानंतर कोलकात्याचा मेंटॉर गौतम गंभीर आणि चेन्नई सुपर किंग्सचा विकेटकीपर बॅट्समन महेंद्रसिंह धोनी यांनी गळाभेट घेतली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांनी गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या मैदानात 2012 मध्ये कोलकात्याने गौतम गंभीरच्या नेतृत्वात धोनीच्या सीएसकेला पराभूत केलं होतं आणि जेतेपदावर नाव कोरलं होतं. दुसरीकडे, या सामन्यापूर्वी गौतम गंभीरने महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलं होतं. यापूर्वी गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची गळाभेट झाली होती. गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी 2011 वनडे वर्ल्डकपचे हिरो होते. अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध धोनीने नाबाद 91 धावा, तर गौतम गंभीरने 97 धावांची खेळी केली होती.
DHONI HUGGING GAMBHIR ⭐
– THE HEROES OF 2011 WC FINAL…!!!pic.twitter.com/Tx72C6LScO
— Johns. (@CricCrazyJohns) April 8, 2024
चेन्नई सुपर किंग्स संघ पुन्हा एकदा विजयाच्या रुळावर आला आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. अखेर कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवता आला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा या स्पर्धेतील पहिला पराभव आहे. गुणतालिकेत कोलकात्याचा संघ दुसऱ्या, चेन्नईचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
