ENG vs IND : एजबेस्टनमध्ये विराट रेकॉर्ड धोक्यात, ऋषभ पंत विक्रम करण्यासाठी तयार
Rishabh Pant Eng vs IND 2nd Test : टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्या निशाण्यावर माजी कर्णधार विराट कोहली याला मागे टाकण्याची संधी आहे. जाणून घ्या सविस्तर.

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. इंग्लंडने लीड्समध्ये टीम इंडियावर मात करत पहिला सामना जिंकला. आता उभयसंघातील दुसरा सामना हा बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक एजबेस्टनमध्ये 2 ते 6 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. भारताचा हा सामना जिंकून पहिल्या पराभवाचा वचपा काढण्यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
इंग्लंड विरूद्धच्या दुसरा कसोटी सामना भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत याच्यासाठी खास ठरु शकतो. पंतला दुसऱ्या कसोटीत माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. पंतला एजबेस्टनमध्ये विराटचा टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढण्याची संघी आहे. पंतला हा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी अवघ्या काही धावांचीच गरज आहे.
पंतच्या निशाण्यावर विराटचा रेकॉर्ड
विराटने कसोटी कारकीर्दीत 2 सामन्यांमधील 4 डावांत 231 धावा केल्या आहेत. विराटने 57.75 च्या सरासरीने ही कामगिरी केली. विराटची या मैदानातील 149 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तर पंतने याच मैदानात 1 सामनाच खेळला आहे. पंतने या एकमेव सामन्यात 101.50 च्या सरासरीने 203 धावा केल्या आहेत. पंतची या मैदानातील 146 सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्यामुळे पंतला विराटचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी फक्त 28 धावांची गरज आहे. या मैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी दिग्गज आणि माजी कर्णधार सुनील गावसकर आहेत. गावसकरांनी या मैदानात 216 धावा केल्या आहेत.
पहिल्या सामन्यात डबल धमाका
भारताला पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करुनही जिंकता आलं नाही. मात्र उपकर्णधार म्हणून पदार्पणात या विकेटकीपर बॅट्समनने धमाका केला. पंतने दोन्ही डावात शतक केलं. पंतने पहिल्या डावात 134 तर दुसऱ्या डावात 118 धावा केल्या. त्यामुळे आता पंतला विराटचा रेकॉर्ड ब्रेक करायचा असेल आणि भारताला जिंकून द्यायचं असेल तर दुसऱ्या सामन्यातही पहिल्या सामन्याप्रमाणेच कामगिरी करावी लागेल.
इंग्लंडची विजयी सलामी
इंग्लंडने बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात पहिल्या कसोटी सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने विजयसाठी मिळालेलं 371 धावांचं आव्हान हे 5 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं होतं. त्यानंतर आता भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यासाठी कंबर कसली आहे. भारताने सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे शुबमनसेना दुसऱ्या सामन्यातून विजयाचं खातं उघडणार का? याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे.
