ENG vs IND : 2 सिक्स आणि रेकॉर्ड फिक्स, यशस्वी जैस्वालला एका झटक्यात चौघांना पछाडण्याची संधी
Yashasvi Jaiswal ENG vs IND 2nd Test : टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक एजबेस्टन मैदानात होणार आहे. यशस्वी जैस्वालला या सामन्यात 4 फलंदाजांना मागे टाकण्याची संधी आहे.

टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली. यशस्वीने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी 20 जून रोजी लीड्समध्ये शतक ठोकलं. यशस्वीचा हा इंग्लंडमधील पहिला कसोटी सामना होता. यशस्वीने इंग्लंडमधील पहिल्याच सामन्यात शतक करत अविस्मरणीय कामगिरी केली. यशस्वीने पहिल्या सामन्यात 101 आणि 4 धावा केल्या. मात्र यशस्वीने फिल्डिंगने घोर निराशा केली. यशस्वीने या सामन्यात एकूण 4 कॅचेस सोडल्या. यशस्वीने या चारही कॅचेस घेतल्या असत्या तर या सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागू शकला असता. इंग्लंडने भारतावर मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आता उभयसंघात दुसरा कसोटी सामना हा 2 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. यशस्वीला या सामन्यात मोठा कारनामा करण्याची संधी आहे.
यशस्वी जैस्वालकडे चौघांना पछाडण्याची संधी
यशस्वीला इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या सामन्यात एका झटक्यात 4 दिग्गज फलंदाजांना षटकारांबाबत मागे टाकण्याची संधी आहे. यशस्वीने कसोटी क्रिकेटमध्ये 40 षटकार लगावले आहेत. यशस्वीने आता दुसऱ्या कसोटीत आणकी 2 षटकार लगावले तर तो एका झटक्यात चौघांना मागे टाकण्यात यशस्वी ठरेल. यशस्वीकडे ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉ, बांगलादेशचा तमीम इक्बाल, विंडीजचा डॅरेन ब्राव्हो आणि न्यूझीलंडच्या कुलीन मुनरो यांना मागे टाकण्याची संधी आहे. या चारही फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 41-41 षटकार लगावले आहेत.
तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्स याच्या नावावर आहे. स्टोक्सने आतापर्यंत 112 सामन्यांमध्ये 133 षटकार लगावले आहेत.
यशस्वीचे कसोटीत 5 शतक
यशस्वीने 2023 साली वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. यशस्वीने तेव्हापासून आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करुन कसोटी संघातील स्थान कायम केलं आहे. यशस्वीने कसोटी कारकीर्दीत 20 सामन्यांमध्ये 1 हजार 903 धावा केल्या आहेत. यशस्वीने या दरम्यान 10 अर्धशतकं आणि 5 शतकं केली आहेत.
इंग्लंड विरुद्धची कामगिरी
यशस्वी जैस्वाल याने आतापर्यंत कसोटीत इंग्लंड विरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. यशस्वीने इंग्लंड विरूद्धच्या एकूण 6 कसोटी सामन्यांमधील 11 डावांत 817 धावा केल्या आहेत. यशस्वीने इंग्लंड विरुद्ध 2 द्विशतकं केली आहेत.
दुसऱ्या कसोटीसाठी टीम जाहीर
दरम्यान यजमान इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या सामन्यासाठी आणखी एका खेळाडूला संधी दिली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. जोफ्राचं यासह कसोटी संघात 2021 नंतर कमबॅक झालं आहे. त्यामुळे जोफ्राला दुसर्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
