IND vs ENG WT20 : महिला ब्रिगेडसमोर इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मोठं आव्हान, नक्की काय?
England vs India Womens T20I Series 2026 : टीम इंडिया आणि इंग्लंड दोन्ही संघांसाठी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेआधी ही टी 20 मालिका रंगीत तालिम असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या मालिकेत चांगली कामगिरी करुन वर्ल्ड कपच्या दृष्टीने जोरदार सराव करण्याचा प्रयत्न असणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेचा विजेता अवघ्या काही दिवसात निश्चित होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वुमन्स टीम इंडिया नव्या मालिकेसाठी सज्ज झाली आहे. वुमन्स टीम इंडियाने मायदेशात नोव्हेंबर 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर आता 12 जूनपासून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्याआधी टीम इंडिया यजमान इंग्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. टीम इंडियाची ही टी 20i वर्ल्ड कपआधी इंग्लंड विरुद्ध होणारी शेवटची मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा ही मालिका जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेआधी जोरदार तयार करण्याचा प्रयत्न असणार आहे.
टीम इंडिया या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकूण 4 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. मालिकेतील सलामीच्या सामन्याला आज 28 मे रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना चेम्सफोर्डमध्ये आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडियाला या मालिकेत आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
टीम इंडियासमोर इंग्लंड दौऱ्यात आव्हान काय?
टीम इंडियासमोर इंग्लंडमधील परिस्थितीसह एकरुप होण्याचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. टीम इंडियासमोर असलेलं दुसरं आव्हान म्हणजे चेम्सफोर्ड काउंटी ग्राउंड. टीम इंडियाने गेल्या 14 वर्षांपासून एकही सामना खेळलेला नाही.
टीम इंडियाकडे इंग्लंडचा हिशोब करण्याची संधी
टीम इंडियाने चेम्सफोर्ड काउंटी ग्राउंडमध्ये अखेरचा सामना हा 2012 साली खेळला होता. तेव्हा इंग्लंडने टीम इंडियावर टी 20i सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता टीम इंडियाकडे 14 वर्षांपूर्वीच्या पराभवाची परतफेड करण्यासह टी 20i मालिकेत विजयी सलामी देण्याची दुहेरी संधी आहे.
स्मृती मंधानाची कामगिरी
तसेच टीम इंडियाची उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हीची कामगिरी चिंताजनक राहिली आहे. स्मृतीने एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे स्मृतीला त्या मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे आता स्मृती इंग्लंड विरूद्धच्या या मालिकेतून कमबॅक करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.