
वनडे वर्ल्डकप 2027 चा रोडमॅप तयार करण्यासाठी बीसीसीआयने संघाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर दिली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. शुबमन गिलच्या नियंत्रणाखाली आता रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहे. या दोघांनी यापूर्वी संघाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे शुबमनच्या नेतृत्वात कसं खेळणार वगैरे प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले आहेत. यावर कर्णधार शुबमन गिलने आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, शुबमन गिल म्हणाला की, “मला वाटते की बाहेरील चर्चा काही वेगळ्या आहेत. परंतु आमच्यात काहीही बदललेले नाही. सर्व काही पूर्वीसारखेच आहे आणि ते खूप उपयुक्त आहे.” तसेच वनडे संघाला बळकटी देण्याची संधी म्हणून कर्णधारपदाकडे पाहात असल्याचं देखील त्याने सांगितलं. “एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा वारसा पुढे नेण्यासाठी माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. मला खूप अनुभव आले आहेत आणि खूप काही शिकायला मिळाले आहे.”
शुबमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत सांगितलं की, “त्यांना जे काही वाटते, त्यांचा अनुभव असो, त्यांनी जे काही शिकले असेल, खेळपट्टी वाचून असो किंवा कोणतीही परिस्थिती असो, मी त्यांच्याकडे जातो आणि त्यांना काय वाटते ते विचारतो. ते माझ्या जागी असते तर ते कसे केले असते. मला लोकांचे विचार जाणून घेणे आवडते आणि नंतर, खेळाबद्दलच्या माझ्या स्वतःच्या समजुतीनुसार, मी त्यानुसार माझे निर्णय घेतो.” रोहित आणि कोहली यांच्याशी त्यांचे संवाद अजूनही मोकळेपणाने आणि सहजतेने सुरू असल्याचं त्याने सांगितलं.
“माझे विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांशीही खूप चांगले संबंध आहेत. जेव्हा जेव्हा मला कोणत्याही गोष्टीबद्दल शंका येते तेव्हा मी त्यांच्याकडे जातो, त्यांचे सूचना घेतो, त्यांचा सल्ला घेतो आणि ते मला काहीही सांगण्यास कधीही मागेपुढे पाहत नाहीत. पहा, मला वाटते की अनुभवाची खरी संपत्ती हीच आहे.”, असंही कर्णधार शुबमन गिल पुढे म्हणाला. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबरला होत आहे. या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाकडे लक्ष असणार आहे.