पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा इफेक्ट! भारत-पाकिस्तान यांच्यातील पाच क्रिकेट सामने होणार रद्द
दहशतवादी देश अशी ओळख असलेल्या पाकिस्तानसोबत भारताने सर्वच संबंध तोडले आहेत. पाकिस्तानसोबत भारताने मागच्या 12-13 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळली नाही. आयसीसी स्पर्धेत फक्त दोन्ही देश आमनेसामने आले आहेत. पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा विरोध आणखी तीव्र झाला आहे.

पाकिस्तान हा देश कायम आपल्या कुरापती आणि दहशतवादी कृत्यांसाठी ओळखला जातो. आतापर्यंत पाकिस्तानने जे पेरलं आहे त्याचे परिणाम दिसत आहे. दहशतवाद्यांना आश्रयही पाकिस्तानात दिला जातो. याची अनेक उदाहरण भुतकाळात दिसून आली आहेत. ओसामा बिन लादेनलाही अमेरिकेने पाकिस्तानातच मारलं होतं. असं असताना पाकिस्तानकडून दहशतवादाला खिळ बसवण्याऐवजी अजून प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे. 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यातही पाकिस्तानचा हात आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. या कृत्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संताप आहे. पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत अशी मागणी होत आहे. तसेच योग्य धडा शिकवावा अशी मागणीही जोर धरत आहे. दरम्यान बीसीसीआयने कठोर पावलं उचलावी अशी मागणी केली जात आहे. पाकिस्तानसोबत कोणत्याही स्पर्धेत खेळू नये. जर ही मागणी मान्य झाली तर एका वर्षात पाच सामने रद्द होऊ शकतात.
भारत आणि पाकिस्तान हे संघ आयसीसी आणि आशिया क्रिकेट काउंसिल स्पर्धेत एकमेकांचा सामना करतात. पण 22 एप्रिलला केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डावर दबाव वाढला आहे. पाकिस्तानविरुद्ध आयसीसी स्पर्धेतही खेळू नये अशी मागणी जोर धरत आहे. बीसीसीआयने या प्रकरणी तसं कोणतीही पाऊल उचलेलं नाही. पण जर असं काही झालं तर एका वर्षात 5 सामन्यांवर गडांतर येणार आहे. यात आशिया कपपासून वर्ल्डकप आणि सिनियर टीमपासून ज्युनियर टीमचा समावेश असेल.
या वर्षी पुरुष आशिया कप खेळला जाणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. ही स्पर्धा पूर्णपणे भारतात खेळली जाईल. मागच्या काही आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक पाहीलं तर दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये असतात. तसेच सुपर 4 फेरीत पुन्हा आमनासामना होतो. यामुळे आशिया कप स्पर्धेतील दोन सामने रद्द होतील. या वर्षी महिला वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन फॉर्मेट खेळली जाईल. या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होईल. त्यामुळे रद्द होणाऱ्या यादीत आणखी एका सामन्याची भर पडेल.
पुरुषांचा 19 वर्षांखालील विश्वचषक पुढील वर्षी खेळवला जाणार आहे आणि यामध्येही भारत आणि पाकिस्तान असेल.पुढील वर्षी भारतात पुरुषांचा टी20 विश्वचषक होणार आहे. मागील टी20 विश्वचषकाप्रमाणे यावेळीही भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयने कठोर पाऊल उचललं तर हे पाच सामने एका वर्षात रद्द होतील.