T20 World Cup : BCCI ची मोठी घोषणा, MS धोनीचं टीम इंडियात कमबॅक, भारताला पुन्हा विश्वविजेता बनविणार?

महेंद्रसिंग धोनी.... कोणत्याही कठीण परिस्थितीत शांत डोक्याने प्रतिस्पर्धी संघांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा याचं नियोजन करण्यात माहिर... अनेक मातब्बर संघांनी त्याच्या करेक्ट कार्यक्रमाचा अनुभव घेतलाय...

T20 World Cup : BCCI ची मोठी घोषणा, MS धोनीचं टीम इंडियात कमबॅक, भारताला पुन्हा विश्वविजेता बनविणार?
MS Dhoni

T20 World Cup : महेंद्रसिंग धोनी…. कोणत्याही कठीण परिस्थितीत शांत डोक्याने प्रतिस्पर्धी संघांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा याचं नियोजन करण्यात माहिर… अनेक मातब्बर संघांनी त्याच्या करेक्ट कार्यक्रमाचा अनुभव घेतलाय… धोनीने टीम इंडियाला अनेक सामने जिंकवून देताना आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफीज भारताला मिळवून दिल्यात. धोनीमुळे भारतवासियांना अनेक सोनेरी क्षण अनुभवायला मिळाले, त्याचं साक्षीदार होता आलं. अगोदर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतलेल्या धोनीने भारताच्या 74 व्या स्वातंत्रदिनी क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली… ‘तो कधीतरी पुन्हा येईल’ अशी अपेक्षा अनेकांना होती… अखेर तो पुन्हा आलाय… भारतीय संघात त्याचं कमबॅक झालंय… पण तो संघात आलाय नव्या भूमिकेत….. टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने काल रात्री भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये 15 सदस्यीय संघाबरोबर आणखी एक मोठी घोषणा होती, ती घोषणा आहे MS धोनी भारतीय टी ट्वेन्टी संघाचा मेन्टॉर असेल.

MS धोनीचं टीम इंडियात कमबॅक

धोनीने आतापर्यंत आपल्या व्यूव्हरचनेने अनेक वेळा प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजलं. शक्य नसतानाही अनेक विजय शक्य करुन दाखवले… कधी आक्रमक धुव्वाधार खेळी करुन तर कधी स्टम्प्सच्या मागे राहून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अनाकलनीय बदल करुन…. आता टी ट्वेन्टी क्रिकेट संघात धोनी खुद्द मैदानावर नसेल पण मैदानाबाहेर राहून तो विराटसेनेला प्रतिस्पर्ध्याना चितपट करण्याचे धडे देणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी धोनीची टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या मेन्टॉरपदी निवड केलीय.

धोनीच्या कमबॅकविषयी जय शाह यांची रोहित-विराटशी चर्चा

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा करतावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं, एम एस धोनी भारतीय संघाचा मेन्टॉर असेल… मी त्याच्यााशी दुबईत चर्चा केलीय… केवळ टी ट्वेन्टी स्पर्धत मेंटॉर बनण्यास तो तयार असल्याचं त्याने मला सांगितलं. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याशीही मी चर्चा केलीय. त्यांचीही याला संमती आहे.

धोनीच्या संघातल्या कमबॅकने गणितं बदलणार!

धोनीचं टीम इंडियात कमबॅक झाल्याने संघाची गणितं बदलणार आहेत. धोनी संयमी आणि शांत आहे तर याच्याअगदी उलट, विराट खूपच आक्रमक आहे.. धोनीच्या शांतपणाचा बहुतेकवेळा भारताला फायदा झालाय. दुसरीकडे विराटच्या आक्रपणामुळे संघाला कधी फायदा तर कधी तोटा होता… आता धोनीच्या संघातल्या नव्या भूमिकेने काही गणितं बदलणार हे निश्चित…! कारण आक्रमक संघाला संयमाची जोड धोनीमुळे मिळणार आहे.

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

धोनीच्या आयुष्यातील शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच…

धोनीचा शेवटचा एकदिवसीय सामना 2019 च्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना होता. यामध्ये त्याने 72 चेंडूत 50 धावा केल्या. भारताला जिंकवून देण्याचा धोनीने आटोकाट प्रयत्न केला. जोपर्यंत धोनी खेळपट्टीवर होता तोपर्यंत संपूर्ण भारत देशालाच नव्हे तर जगाला विश्वास होता की हा सामना भारतच जिंकणार, परंतु मार्टिन गप्टिलच्या शानदार ‘थ्रो’वर धोनीची एक उत्तम इनिंग संपुष्टात आली. विशेष म्हणजे धोनी त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही धावबाद झाला होता.

धोनीने बांगलादेशविरुद्ध पदार्पण केलं होतं आणि खातंही न उघडता धावबाद झाला होता. धोनी 350 एकदिवसीय, 90 कसोटी आणि 98 टी -20 सामने खेळला. डिसेंबर 2004 मध्ये सुरु झालेल्या त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण 15 हजार धावा, 16 शतके आणि यष्टीरक्षणात 800 पेक्षा जास्त झेल घेतले.

हे ही वाचा :

T20 world Cup : रविंद्र जाडेजा ते आर अश्विन, फिरकीच्या जोडीला शमी-बुमराह-भुवीचं वेगवान अस्त्र, भारतीय गोलंदाजांचा ताफा कसा?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI