IND vs SL: कसोटी मालिकेत श्रीलंकेला गुरनूर ब्रारची सर्वाधिक धास्ती! त्याचं कारण असं की…
भारतीय संघ श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. असं असताना श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू फरवीज महरूफने गुरनूर ब्रारबाबत एक मोठं विधान केलं आहे.

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून इथल्या खेळपट्ट्या या फिरकीला मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे फिरकीचा सामना करण्यासाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. दुसरीकडे, भारतीय फिरकी गोलंदाज श्रीलंकन फलंदाजांना फिरकीवर नाचवण्यास सज्ज झाले आहेत. तर वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या हाती असणार आहे. पण असं असताना जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत गुरनूर ब्रारचं नाणं खणखणीत वाजेल असं श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू फरवीज महरूफ याचं म्हणणं आहे. श्रीलंकेत भारतासाठी गुरनूर ब्रार हा एक्स फॅक्टर सिद्ध होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. महरूफ यांच्या मते, 15 ऑगस्टपासून गॉल कसोटी सामना सुरू होईल आणि या सामन्यात गुरनूर पदार्पण करू शकतो. जर असं झालं तर मोहम्मद सिराजला गोलंदाजीत गुरनूर ब्रार साथ देईल.
जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत काय?
माजी अष्टपैलू खेळाडू फरवीज महरूफ यांनी सोनी स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, ‘जसप्रीत बुमराहकडे रिव्हर्स स्विंग करण्याची ताकद आहे. त्यामुळे भारताला त्याची उणीव भासेल. इतकंच काय तर त्याची विकेट घेण्याची क्षमता पाहता बराच फरक पडू शकतो. मोहम्मद सिराज एक चांगला गोलंदाज आहे. त्याचा मान राखतो, पण या दोन्ही गोलंदाजांची तुलना केली तर त्यात बराच फरक आहे.’ महरूफ यांनी पुढे गुरनूर ब्रार यांचं कौतुक केलं आणि म्हणाले की, ब्रारची गती आणि एक्स्ट्रा बाउंस निर्णायक ठरू शकतो.
महरूफ यांनी गुरनूरबाबत सांगितलं की, ‘सराव सामन्यात त्याने कसोटी सामन्यात सहभागी असलेल्या फलंदाजांना जे चेंडू टाकले, त्यात ते अडचणीत आले. इतकंच काय काही खेळाडूंच्या शरीरावरही चेंडूंचा मारा झाला. मी जर टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनात असतो तर मी गुरनूर ब्रारला संधी देण्याबाबत विचार केला असता. कोणत्याही फलंदाजाची लय तोडण्यात ब्रार सक्षम आहे.’
ब्रारची श्रीलंकेतील जबरदस्त कामगिरी
गुरनूर ब्रारने श्रीलंकेत आपल्या कामगिरीने यापूर्वीच लक्ष वेधून घेतलं आहे. श्रीलंका अ विरूद्धच्या सामन्यात त्याने 10 विकेट घेतल्या होत्या. त्याने आपल्या वेगवान उसळीच्या जोरावर फलंदाजांना अडचणीत आणलं होतं. इतकंच काय तर सहा वनडे सामन्यात त्याने 11 विकेट काढल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 19 सामन्यात 62 विकेट घेतल्या आहेत.
