टीम इंडियाच्या जेतेपदाच्या मार्गात चार स्पीड ब्रेकर! रोहित शर्माचं टेन्शन वाढलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आहे. सुपर 8 फेरीतील जवळपास निश्चित आहे. मात्र असं असताना जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होणार का? असा प्रश्न आहे. कारण टीम इंडियाच्या जेतेपदाच्या वाटेत चार अडसर आहेत. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना ही चिंता आता सतावत आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली आहे. साखळी फेरीत भारताने चांगली कामगिरी केली आहे. आता सुपर 8 फेरीच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. कारण भारताने दोन विजयासह सुपर 8 फेरीतील स्थान जवळपास निश्चित केलं आहे. असं असूनही टीम इंडियापुढील अडचणींचा पाढा काही कमी झालेला नाही. मागच्या दोन सामन्यात टीम इंडियाच्या बऱ्याच उणीवा समोर आल्या आहेत. अशा स्थितीत जेतेपदाची स्वप्न पाहणं कठीण वाटत आहे. चार अडचणी वेळेआधीच सुटणं गरजेचं आहे अन्यथा प्रतिस्पर्धी संघ हावी होऊ शकतात. बाद फेरीत या चुका कायमच्या महागात पडतील. सर्वात आधी म्हणजे विराट कोहलीचा फॉर्म..विराट कोहलीची बॅट आयपीएलमध्ये तळपली, पण टी20 वर्ल्डकपमध्ये मात्र गप्प आहे. विराटच्या बॅटमधून हव्या तशा धावाच आल्या नाहीत. आयर्लंडविरुद्ध 1 आणि पाकिस्तानविरुद्ध 4 धावा करून तंबूत परतला. विराट कोहलीला ओपनिंगला उतरून धावा करणं कठीण जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्याने आता तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजीला उतरावं असा मतप्रवाह तयार होत आहे.
दुसरा खेळाडू शिवम दुबे…आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबेला नजर लागली आहे. टीम इंडियात निवड झाल्यापासून त्याच्या बॅटिंगला ग्रहण लागलं आहे. मागच्या दोन सामन्यात फक्त 3 धावा करू शकला आहे. एकेरी धावा घेऊन स्ट्राईक बदलण्यातही अपयशी ठरत आहे. त्यामुळे मधल्या फळीत विश्वास ठेवण्यात अर्थ नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे यावर लवकरच तोडगा काढणं गरजेचं आहे.
सूर्यकुमार यादव..अमेरिकेतील खेळपट्टी धीम्या असल्याने सूर्यकुमार यादवची चमक दिसणं कठीण आहे. आक्रमक फलंदाजी आणि त्याच्या स्टाईलसाठी चेंडू वेगाने बॅटवर येणं गरजेचं आहे. पण या खेळपट्ट्यांवर चेंडू थांबत बॅटवर येत आहे. त्यात ताकद काढून चेंडू सीमेपार पोहोचवण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म रोहित शर्मासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
रवींद्र जडेजाला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळतं. पण गेल्या काही वर्ल्डकपमध्ये त्याचा तसा काही फायदा झालेला नाही. मागच्या काही टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 10 डावात त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा कमी आहे. 10 डावात त्याने त्याने फक्त 95 धावा केल्या आहेत. तर 21 गडी बाद केले आहेत. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
