विराट कोहलीचं सलग दुसरं शतक, नजरा मात्र गौतम गंभीरकडे, अशी होती प्रतिक्रिया
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुन्हा एकदा विराट-रोहित आणि गौतम गंभीर यांच्या वादाच्या बातम्या समोर येत आहे. पण त्यात कितपत तथ्य हे मात्र सांगता येणं कठीण आहे. असं असताना विराट कोहलीने सलग दुसरं शतक ठोकलं आणि सर्वांच्या नजरा खिळल्या त्या गौतम गंभीरकडे...

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी20 आणि कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे हे दोघंही वनडे मालिकेत खेळताना दिसतात. असं असताना या दोन दिग्गज खेळाडूंचा गौतम गंभीरशी संपर्क आता वनडे मालिकांपुरता मर्यादीत राहिला आहे. असं असताना दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिका सुरु झाल्यानंतर पहिल्या सामन्यापासून वादाच्या बातम्या समोर येत आहेत. या बातम्या खऱ्या की खोट्या हे सांगणं आतातरी कठीण आहे. पण या तिघांच्या हावभाव आणि प्रतिक्रियांकडे लक्ष लागून असतं. त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते इथपासून सोशल मीडियावर चर्चा होत असते. अशा स्थितीत विराट कोहलीने सलग दुसरं शतक ठोकलं. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर याची प्रतिक्रिया काय असेल याकडे साऱ्या क्रीडाविश्वाचं लक्ष लागून होतं. असं असताना विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने रायपूरमध्ये वनडे क्रिकेटमधील 53वं शतक ठोकलं. यानंतर संपूर्ण मैदानात एकच जल्लोष झाला. कारण विराट कोहलीचा फॉर्म पाहता तो आरामात 2027 वनडे वर्ल्डकप खेळू शकतो अशी भावना क्रीडाप्रेमींमध्ये तयार झाली आहे. दुसरीकडे, गौतम गंभीरने विराटच्या शतकानंतर कशी प्रतिक्रिया दिली यासाठी सोशल मीडियावर सर्च ऑपरेशन सुरु झालं आहे. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. विराटच्या शतकानंतर गौतम गंभीर खूर्चीतून उठला आणि टाळ्या वाजवू लागला. यावेळी गौतम गंभीर खूपच खूश होता. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वावड्या आणि गौतम गंभीरची रिएक्शन पाहता असंच काही झालं नसावं अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.
Smile and applaud, GG. 😀#INDvSA #fblifestyle pic.twitter.com/f8c3xyV0z5
— Cricketangon (@cricketangon) December 3, 2025
विराट कोहली या वनडे सामन्यात वेगळ्याच अंदाजात दिसून आला. त्याने षटकार मारत आपल्या डावाची सुरुवात केली. असं त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच केलं. दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडीत काढला. एकाच पोझिशनवर सर्वाधिक 46 शतकं ठोकणारा फलंदाज ठरला आहे. तसेच विराटने 11व्या वनडे सलग दोन शतकं ठोकण्याचा विक्रम केला आहे. तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सलग तीन शतकं ठोकण्याचा विक्रम केला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्याने 7 वनडे शतकं ठोकली आहे.
