चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कसा असेल भारतीय संघ? सात महिन्यात या खेळाडूंची होणार चाचपणी
टी20 वर्ल्डकप विजयानंतर भारतीय संघाचं पुढचं लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफीकडे असणार आहे. याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी घोषणा देखील केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया या स्पर्धेत खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार आहे. पण या स्पर्धेत टीम इंडिया खेळणार की नाही ते अद्याप अस्पष्ट आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियात बऱ्याच उलथापालथ झाल्या आहे. या फॉर्मेटमधून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. पण वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये खेळणार हे निश्चित आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा वनडे फॉर्मेटमध्ये असणार आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळलेले खेळाडू आणि चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बदल पाहायला मिळणार हे निश्चित आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. तसेच हार्दिक पांड्या दुखापतीमुळे मधेच स्पर्धा सोडून बाहेर पडला होता. त्यामुळे बरीच उलथापालथ झाली होती. आता नव्या प्रशिक्षकासह संघात काही बदल दिसू शकतात. काही खेळाडूंना वगळलं जाईल. तर काही खेळाडूंना या संघात संधी मिळू शकते. चला जाणून घेऊयात पुढच्या सात महिन्यात कोणत्या खेळाडूंवर नजर असेल आणि कोणाला संधी मिळू शकते ते..
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मासोबत शुबमन गिल ओपनिंगला येऊ शकतो. 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत या दोघांनी ओपनिंग केली होती. तसेच ऋतुराज गायकवाडची ओपनिंगसाठी बॅकअप म्हणून निवड होऊ शकते. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. मधल्या फळीत ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसनची निवड होऊ शकते. ऋषभ पंत 2023 वर्ल्डकप स्पर्धेत नव्हता. चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याला संधी मिळू शकते. डावखुरा असल्याने त्याचा विचार केला जाऊ शकतो.
केएल राहुलची टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत निवड झाली नव्हती. मात्र वनडे फॉर्मेट असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विचार केला जाऊ शकतो. संजू सॅमसनची निवडही निश्चित असल्याचं दिसत आहे. हार्दिक पांड्याला संघात अष्टपैलू म्हणून संधी मिळेल. फिरकीची धुरा कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या खांद्यावर असेल. तर वेगवान गोलंदाजीचा धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीकडे असेल.
दुखापतीमुळे बाहेर असलेला मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत संघात पुनरागमन करू शकतो. दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल, रिंकु सिंह, श्रेयस अय्यर, आवेश खान, मुकेश कुमार, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकुर यांना संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, ऋषभ पंत, संजू सॅमसन, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
