ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीसाठी कशी असेल रणनिती? कर्णधार रोहित शर्मा म्हणाला…
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी चार संघ ठरले आहेत. उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 4 मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने आपली रणनिती स्पष्ट केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. या स्पर्धेतील तीन सामने शिल्लक असून चार संघांनी जेतेपदासाठी कंबर कसली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी स्पर्धेतील द्वंद्व सर्वांनाच माहिती आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ कायमच भारतावर वरचढ ठरला आहे. त्यामुळे भारताचं टेन्शन उपांत्य फेरीतच वाढलं आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीतही ऑस्ट्रेलियाने भारताचं स्वप्न मोडलं होतं. आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आले आहेत. 19 नोव्हेंबर 2023 च्या त्या नकोशा दिवसानंतरर भारत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे. स्पर्धा वेगवेगळ्या पातळीवर असल्याने सूड उगवणे असे बोलणं चुकीचे ठरतील. परंतु आयसीसीच्या बाद फेरीतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना एक रोमांचक सामना असेल.
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार असल्याने कर्णधार रोहित शर्मानेही शड्डू ठोकला आहे. कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलियाचा आयसीसी स्पर्धा चांगल्या प्रकारे खेळण्याचा समृद्ध इतिहास आहे. परंतु आम्ही त्या विशिष्ट दिवशी आम्हाला काय चांगले करायचे आहे याबद्दल विचार करत आहोत. ही एक उत्तम स्पर्धा असेल, त्याची वाट पाहत आहे. आशा आहे की आम्ही जे काही करू ते चांगल्या प्रकारे करू.’
दोन्ही संघाचे खेळाडू
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया संघ: मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, स्पेन्सर जॉन्सन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, शॉन अॅबॉट, तन्वीर संघा.
