T 20i Series : पाकिस्तानविरुद्ध 5 टी 20 सामन्यांसाठी टीम जाहीर, रवींद्रचा समावेश नाही, पाहा कुणाला संधी?
Icc Champions Trophy 2025 स्पर्धेनंतर पुन्हा एकदा दोन्ही संघ टी 20i मालिकेत आमनेसामने असणार आहेत. जाणून घ्या पहिला सामना केव्हा होणार?

चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील पराभव विसरुन न्यूझीलंड टीम पुढील तयारीला लागली आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीम मायदेशात पाकिस्तानविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या 5 टी 20i सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निवड समितीने चॅम्पियन्स ट्रॉफी संघातील 7 खेळाडूंचीच पाकिस्तानविरुद्धच्या टी 20i मालिकसाठी निवड केली आहे. न्यूझीलंडचा ऑलराउंडर मायकल ब्रेसवेल याला टी 20i संघांचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. ब्रेसवेलची मायदेशात नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. आयपीएलसाठी अनेक संघांनी खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंचाही समावेश आहे. रचीन रवींद्र, डेव्हॉन कॉन्व्हे, लॉकी फर्ग्यूसन, ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनर हे न्यूझीलंडचे नियमित खेळाडू आहेत. मात्र हे खेळाडू आयपीएलमुळे उपलब्ध नसल्याने न्यूझीलंड संघात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. तसेच काही दुखापतग्रस्त खेळाडूंचंही या मालिकेनिमित्ताने पुनरागमन झालं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागल्यानंतर ईश सोढी याचं कमबॅक झालं आहे. बेन सियर्स हा देखील परतला आहे. कायले जेमिन्सन आणि विलियम ओ’रुर्के या दोघांना वर्कलोडमुळे पहिल्या 3 सामन्यांसाठीच संधी देण्यात आली आहे. तसेच खांद्याच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधून बाहेर पडणारा मॅट हॅन्री फिट झाला आहे. मॅटचा चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पुन्हा भिडणार
तसेच दोन्ही संघ पुन्हा एकदा या मालिकेनिमित्ताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर आमनेसामने येणार आहेत. उभयसंघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 19 फेब्रुवारीला आमनेसामने आले होते. न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत केलं होतं.
टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 16 मार्च, ख्राईस्टर्चच
दुसरा सामना, 18 मार्च, डुनेडीन, यूनिव्हर्सिटी ओव्हल
तिसरा सामना, 21 मार्च, ऑकलँड
चौथा सामना, 23 मार्च, माउंट मौंगानुई
पाचवा सामना, 26 मार्च, वेलिंग्टन
टी 20i मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : मायकल ब्रेसवेल (कॅप्टन), फिन एलन, मार्क चॅपमॅन, जॅकब डफी, जॅक फाउलकेस (शेवटच्या 2 सामन्यांसाठी), मिच हे, मॅट हेनरी (शेवटच्या 2 सामन्यांसाठी), कायल जेमीसन (पहिल्या 3 सामन्यांसाठी), डेरिल मिचेल, जेम्स नीशम, विल ओ’रुर्के (पहिल्या 3 सामन्यांसाठी), टीम रॉबिन्सन, बेन सियर्स, टीम सायफर्ट आणि ईश सोढी.
टी 20i मालिकेसाठी पाकिस्तान टीम : सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, हारिस रौफ, हसन नवाज, जहंदाद खान, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हारिस, मुहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसुफ, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम आणि उस्मान खान.
