
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होणार हे आधीच ठरलं होतं. पण ऐनवेळी बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला आणि आयसीसीची धावाधाव झाली. बांगलादेशला वगळून स्कॉटलँडची स्पर्धेत एन्ट्री झाली. दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशवर अन्याय झाल्याचं सांगत भारताविरुद्ध खेळणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे जवळपास दोन आठवडे डोकेदुखी सुरू होती. पाकिस्तानची मनधरणी करण्यासाठी खलबतं सुरू होती. पाकिस्तानची मनधरणी करण्यासाठी आयसीसीला टोकाचे प्रयत्न करावे लागले. अखेर हा सामना 15 फेब्रुवारीला झाला आणि भारताने विजय मिळवत सुपर 8 फेरी गाठली. पण हा निकाल येण्यापूर्वी आयसीसीची धाकधूक वाढली होती. कारण हा सामना रद्द झाला असता तर स्पर्धेवर परिणाम दिसून आला होता. इतकंच काय तर आर्थिक नुकसान झालं असतं ते वेगळंच. आता ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका रिपोर्टनुसार आणि त्यात केलेल्या दाव्यानुसार आयसीसी भारताकडून येत्या काही स्पर्धेचं यजमानपद काढू शकते.
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेरल्डच्या वृत्तानुसार, भारत बांग्लादेश यांच्यातील राजकीय वाद पाहता आयसीसी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. 2029 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडून हिसकावून घेऊ शकते. भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत असंच नातं राहिलं तर दोन्ही देश भारतात जाण्यास नकार देतील. त्यामुळे स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळू शकते. पण चॅम्पियन्स ट्रॉफी 2029 स्पर्धेतील 8 संघात पाकिस्तान आणि बांग्लादेश नसेल तर ही स्पर्धा भारतातच होईल. दुसरीकडे, 2031 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि बांगलादेशला संयुक्तपणे मिळालं तर प्रश्नच येणार नाही.
वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारतासाठी भविष्यात डोकेदुखीचं कारण ठरणार आहे. कारण या स्पर्धेत दोन देशांनी असाच पवित्रा ठेवला तर आयसीसी ठोस पावलं उचलू शकते. ऑस्ट्रेलियाला एक बॅकअप यजमानपद म्हणून तयारीत राहावं लागणार आहे. क्रिकेटचे तीन वेगवेगळे फॉर्मेट आहेत आणि तिन्ही फॉर्मेटसाठी आयसीसी स्पर्धांचं आयोजन करतं. इतकंच काय तर वुमन्स आयसीसी स्पर्धांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या काळात राजकीय समीकरण कशी बदलतात यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.