AUSW vs INDW : कॅप्टन हरमनप्रीत कौरची फायर खेळी, ऑस्ट्रेलियासमोर 171 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया जिंकणार?
Australia vs India Womens 1st Innings : टीम इंडियाच्या 150 धावा होतील का? अशी स्थिती होती. मात्र भारताने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फटकेबाजी करुन 170 धावापर्यंत मजल मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवता आलं.

कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये 20 षटकांत 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. हरमनप्रीतने शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स ठोकून भारताला 170 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच उपकर्णधार स्मृती मंधाना, ओपनर शफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स या तिघींनी 30 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र या तिघींपैकी एकीलाही आणखी मोठी खेळी करता आली नाही. आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 8.55 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत. आता ऑस्ट्रेलिया विजयी आव्हान पूर्ण करणार की भारतीय गोलंदाज उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून देणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
टीम इंडियाची बॅटिंग
कर्णधार हरमनप्रीत कौर हीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. दोघींनी 66 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर भारताने शफालीच्या रुपात पहिली विकेट गमावली. शफालीने 34 धावा केल्या. शफाली आऊट झाल्यानंतर स्मृतीने जेमिमाह रॉड्रिग्ससह काही धावा जोडल्या. मात्र दोघांमधील संवादाच्या अभावामुळे स्मृती रन आऊट झाली. स्मृतीने 37 बॉलमध्ये 38 रन्स केल्या. स्मृतीला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र स्मृती घाईगडबडीत विकेट गमावून बसली.
त्यानतंर जेमिमा आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 45 बॉलमध्ये 64 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर गरजेनुसार जेमिमाहला रिटायर्ड आऊट करण्यात आलं. जेमीने 28 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. जेमीनंतर ऋचा घोष मैदानात आली. शेवटचे 6 चेंडूत शेष असल्याने ऋचाकडून भारताला फटकेबाजी अपेक्षित होती. मात्र हरमनप्रीत कौरने धमाका केला. हरमनप्रीतने सलग 3 षटकार लगावले. भारताने शेवटच्या षटकात 23 धावा मिळवल्या. हरमनप्रीतने या दरम्यान अर्धशतक पूर्ण केलं. हरमनप्रीत यासह टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी वेगवान अर्धशतक पूर्ण करणारी फलंदाज ठरली. हरमनप्रीत कौर हीने 27 चेंडूत 56 धावा केल्या. तर ऋचा घोष (1) आणि दीप्ती शर्मा (4) या नाबाद परतल्या. तर ऑस्ट्रेलियासाठी कॅप्टन सोफी मोलिनिक्स हीने दोन्ही विकेट्स मिळवल्या.