IND vs ENG : भारत इंग्लंड कसोटी मालिका ड्रा झाली तर ट्रॉफी कोणाला मिळणार? जाणून घ्या नियम
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लंडनच्या केनिंग्टन ओवल मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेत इंग्लंड आघाडीवर असून 2-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे या मालिकेचा निकाल पाचव्या कसोटीवर अवलंबून असणार आहे.

भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील चार सामन्यांचा खेळ संपला आहे आणि 2-1 एक अशी स्थिती आहे. इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकला, दुसरा कसोटी सामना भारताने, तिसरा कसोटी सामना इंग्लंडने आणि चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला. त्यामुळे या मालिकेचा निकाल आता पाचव्या कसोटीत लागणार आहे. पाचवा कसोटी सामना 31 जुलै रोजी लंडनच्या केनिंग्टन ओवल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. इंग्लंडने हा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तर मालिका जिंकेल. पण भारताने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल. ही मालिका बरोबरीत सुटली तर ट्रॉफी कोणाच्या हाती सोपवली जाणार? हा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला आहे. ट्रॉफी इंग्लंडमध्ये असेल की भारतात येईल? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या.
मालिका ड्रॉ झाली तर कोणाला मिळणार ट्रॉफी?
द्विपक्षीय कसोटी मालिका ड्रॉ झाल्यानंतर ट्रॉफी मागच्या वेळी मालिका जिंकलेल्या संघाला दिली जाते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटची मालिका 2021-22 मध्ये खेळली गेली होती. तेव्हाही मालिका बरोबरीत सुटली होती. यापूर्वी 2018 मध्ये मालिका खेळली गेली होती. तेव्हा इंग्लंडने भारताला 4-1 ने पराभूत केलं होतं. तेव्हा ही ट्रॉफी मालिका ड्रॉ झाली तर इंग्लंडला मिळेल. कारण विजयाचं गणित इंग्लंडच्या बाजूने आहे. भारताने शेवटची कसोटी मालिका राहुल द्रविडच्या नेतृत्वात 2007 मध्ये जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत भारताला ही मालिका जिंकता आलेली नाही. या पर्वातही भारताकडून विजयाची संधी निघून गेली आहे.
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेला यापूर्वी पतोडी ट्रॉफी असं संबोधलं जात होतं. मात्र यंदाच्या पर्वापासून या ट्रॉफीला अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी हे नाव देण्यात आलं आहे. तर पतोडी यांच्या नावाने पदक दिलं जाणार आहे. भारताने तिसरा कसोटी सामना हातातून गमावला. खरं तर हा सामना जिंकण्याची पुरेपूर संधी होती. भारताला फक्त 22 धावांनी हार पत्कारावी लागली होती. अष्टपैलू रवींद्र जडेजा याने शेवटपर्यंत झुंज दिली. पण दुसऱ्या बाजूने त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. चौथा कसोटी सामना ड्रॉ करण्यातही रवींद्र जडेजाची मोठी भूमिका राहिली. वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं.
