Asia Cup 2025 : भारताविरूद्धचा सामना गमवताच पाकिस्तान स्पर्धेतून आऊट? गणित समजून घ्या
आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येत आहेत. या सामन्यातील विजयी संघाला थेट सुपर 4 मध्ये जागा मिळणार आहे. पण जर हा सामना पाकिस्तानने गमावला तर त्यांचं पुढचं गणित बिघडणार आहे. कदाचित स्पर्धेतून पत्ता कापला जाऊ शकतो. कसं काय ते समजून घ्या.

आशिया कप स्पर्धेतील सर्वात चर्चित सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण खेळ असून कधी काय होईल सांगता येत नाही. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात हा सामना होत आहे. सुपर 4 च्या दृष्टीने दोन्ही संघांना हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. भारताने हा सामना जिंकला तर थेट सुपर 4 मध्ये जागा निश्चित होणार आहे. पण पाकिस्तानने हा सामना गमावला तर त्यांचं पुढचं गणित किचकट होणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात ओमानचा 93 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे गुणतालिकेत पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली आहे. पण भारताविरूद्धच्या सामन्यात कसोटी लागणार आहे. कारण या सामन्यात पाकिस्तानचं नेट रनरेटचं गणित महत्त्वाचं असणार आहे. भारतीय संघाचा फॉर्म जबरदस्त आहे.
भारताने पहिल्याच सामन्यात युएईचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात दोन गुण आहेत. मात्र नेट रनरेटच्या आसपास कुणीच नाही. टीम इंडिया एका सामन्यात एका विजयासह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. नेट रन रेट देखील 10.483 आहे. त्यामुळे दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर भारताचं सुपर 4 फेरीचं तिकीट पक्कं आहे. तर पाकिस्तानने हा सामना गमावला तर त्यांच्या खात्यात फक्त 2 गुणच शिल्लक राहतील. त्यामुळे 17 सप्टेंबर युएईविरुद्धच्या सामन्यात करो या मरोची स्थिती असेल. अशा स्थितीत युएई आणि ओमानविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून राहावं लागेल. युएईने हा सामना जिंकला तर सुपर 4 च्या शर्यतीत येईल. शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून सुपर 4 फेरीत पोहोचण्याची संधी आहे. कारण या सामन्यातही पाकिस्तानचा पराभव झाला तर आऊट होईल.
गट अ मधून भारतीय संघ सुपर फेरीत खेळणार हे जवळपास निश्चित आहे. कारण भारताचा शेवटचा सामना ओमानविरुद्ध आहे. दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जर टॉप 2 मध्ये राहिले तर पुन्हा सुपर 4 फेरीत समोरासमोर येतील. सुपर 4 फेरीत देखील दोन्ही संघ टॉपला राहिले तर अंतिम फेरीत आमनासामना होईल. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान हे संघ तीन वेळा आमनेसामने येतील.
