IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका टी20 सामना, सचिन तेंडुलकर उतरणार सलामीला
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सिक्सर किंग युवराज सिंग पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक दशकानंतर ही जोडी मैदानात उतरणार आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर लीग 2025 स्पर्धेत भारताचा पहिला सामना श्रीलंकेशी होणार आहे.

आंतरराष्ट्रीय मास्टर लीग टी20 स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारताचा पहिला सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्पोर्ट अकादमीत रंगणार आहे. ‘गेल्या काही वर्षांत श्रीलंकेविरुद्ध खेळताना आम्हाला काही अविस्मरणीय क्षण मिळाले, 2011 चा विश्वचषक त्यापैकी सर्वात खास होता,’ असे इंडिया मास्टर्स संघाचा कर्णधार तेंडुलकर याने सांगितलं. ‘इतक्या वर्षांनी मैदानावर परतणे आणि आमच्या क्रिकेट प्रवासात इतका मोठा भाग असलेल्या संघाचा सामना करणे, हे आणखी खास आहे.’ असंही सचिन तेंडुलकर याने पुढे सांगितलं. भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे सहा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा नवी मुंबई, वडोदरा आणि रायपूर येथे आयोजित केली आहे.
“मी पुन्हा मैदानावर परतण्यासाठी उत्सुक आहे. भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना नेहमीच एक हायव्होल्टेज आणि रोमांचक सामना राहिला आहे आणि मला माहित आहे की चाहते आमच्याइतकेच उत्साहित आहेत.’, असं सिक्सर किंग युवराज सिंगने सांगितलं. या स्पर्धेत इरफान आणि युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी आणि इतर खेळाडू पुन्हा एकदा खेळताना दिसतील.
View this post on Instagram
दोन्ही संघाचे खेळाडू
इंडिया मास्टर्स: सचिन तेंडुलकर (कर्णधार), सौरभ तिवारी, गुरकीरत सिंग मान, अंबाती रायडू, युवराज सिंग, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, इरफान पठाण, पवन नेगी, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, धवल कुलकर्णी, राहुल शर्मा, शाहबाज नदीम, विनय कुमार.
श्रीलंका मास्टर्स: कुमार संगकारा (कर्णधार), लाहिरा थिरिमाने, उपुल थरंगा, असाला गुणरत्ने, आशान प्रियरंजन, चिन्थका जयसिंघे, चतुरंगा डी सिल्वा, दिलरुवान परेरा, जीवन मेंडिस, इसुरु उडाना, रोमेश कालुविथरना, सीक्कुगे प्रसन्ना, धम्मी प्रसन्ना, नुवांग प्रसन्ना, नुवांग प्रसाद.
