IND vs AUS : विराटच्या निशाण्यावर महारेकॉर्ड, फक्त 54 धावांचीच गरज, ठरणार दुसराच फलंदाज
ndia vs Australia Odi Series 2025 : विराट कोहली याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजमध्ये महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. विराटची बॅट चालली तर पहिल्याच सामन्यात किंग कोहली महारेकॉर्ड करु शकतो.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कमबॅकचे वेध साऱ्या क्रिकेट विश्वाला लागले आहेत. रोहित आणि विराट आयसीसी वनडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलनंतर पहिल्यांदाच टीम इंडियाच्या जर्सीत ऑन फिल्ड दिसणार आहेत. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मलिकेतून विराट-रोहित जोडी कमबॅक करणार आहेत. या मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच शुबमन गिल या मालिकेतून एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. तर श्रेयस अय्यर उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. विराटला या मालिकेत मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
विराटला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होण्याची सुवर्णसंधी आहे. विराटकडे श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा याला मागे टाकून ही कामगिरी करण्याची संधी आहे. विराटने गेली अनेक वर्ष सातत्याने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे विराट या मालिकेत संगकाराला मागे टाकणार, असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे.
विराटला फक्त 54 धावांचीच गरज
संगकाराला मागे टाकण्यासाठी विराटला फक्त 54 धावांचीच गरज आहे. विराट वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराटने 14 हजार 181 धावा केल्या आहेत. तर संगकाराच्या नावावर 404 एकदिवसीय सामन्यांमध्ये 14 हजार 234 धावांची नोंद आहे. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग चौथ्या स्थानी आहे. पॉन्टिंगने एकदिवसीय कारकीर्दीत एकूण 13 हजार 704 धावा केल्या होत्या.
विराटच्या कामगिरीकडे लक्ष
रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या या अनुभवी जोडीने टी 20I आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच टीम इंडियाची वनडेतील चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल ही शेवटची मॅच होती. भारताने 9 मार्चला हा सामना खेळला होता. त्यामुळे रोकोला पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहेत.
विराटची चॅम्पिटन्स ट्रॉफीतील कामगिरी
विराटने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 5 सामन्यांमध्ये 1 शतकासह एकूण 218 धावा केल्या होत्या. विराटने पाकिस्तान विरुद्ध शतक केलं होतं. त्यामुळे विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक करुन जोरदार कमबॅक करावं, अशी अपेक्षाही चाहत्यांना आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर : 18 हजार 426 धावा
कुमार संगकारा : 14 हजार 234 धावा
विराट कोहली : 14 हजार 181 धावा
रिकी पॉन्टिंग : 13 हजार 704 धावा
सनथ जयसूर्या : 13 हजार 430 धावा
