IND vs ENG : यशस्वी जयस्वालची शतकी खेळी, इंग्लंडमध्ये रचला इतिहास
इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने शतकी खेळी करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. तसेच काही विक्रम आपल्या नावावर केले.

भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला असला तरी पहिला डाव गाजवला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल बाद झाला आणि ही जोडी फुटली. साई सुदर्शनही काही खास करू शकला नाही. पण यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुबमन गिल यांनी डाव सावरला. यशस्वी जयस्वालने कसोटीतील पाचवं आणि इंग्लंडमध्ये पहिलं शतक ठोकलं. इंग्लंडविरुद्ध यशस्वी जयस्वालचं हे तिसरं शतक आहे. यशस्वी जयस्वालने 144 चेंडूंचा सामना केला आणि 16 चौकार आणि 1 षटकार मारत शतक पूर्ण केलं. त्याने 69.44 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहे. हेडिंग्लेच्या मैदानावर शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी कोणत्याही भारतीय सलामीवीराला ही कामगिरी करता आली नव्हती.तिसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 गडी बाद 215 धावा केल्या. यात यशस्वी जयस्वाल नाबाद 100 तर शुबमन गिल नाबाद 58 धावांवर खेळत आहे. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली आहे.
इंग्लंडविरुद्ध यशस्वी जयस्वालचा हा सहावा कसोटी सामना आहे. त्याने या टीमविरुद्ध प्रत्येक कसोटी 50 हून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन द्विशतकं ठोकली होती. इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर जयस्वालचा हा पहिला सामना होता. या सामन्यात त्याने शतक ठोकला आणि इतिहास रचला.
📸 📸
A celebratory run 👌
The hands aloft 🙌
The trademark jump ☺️
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @ybj_19 pic.twitter.com/E4PDGDOKEb
— BCCI (@BCCI) June 20, 2025
यशस्वी जयस्वालने 2023 मध्ये वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात पदार्पण केलं होतं. आतापर्यंत खेळलेल्या 20 सामन्यातील 37 डावात 1898 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालने 5 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद 214 धावा आहे. भारताबाहेर त्याने तीन शतकं ठोकली आहेत. आता वेगाने 2 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज ठरण्याच्या दिशेने कूच केली आहे.
