IND vs ENG: टीम इंडियासमोर इंग्लंडचं 388 धावांचं कठीण आव्हान, लॉर्ड्सवर 1975नंतर मोठा विक्रम

इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी धावांचं कठीण आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे. निर्णायक सामना असल्याने रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांकडून क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहेत.

IND vs ENG: टीम इंडियासमोर इंग्लंडचं 388 धावांचं कठीण आव्हान, लॉर्ड्सवर 1975नंतर मोठा विक्रम
IND vs ENG: टीम इंडियासमोर इंग्लंडचं 388 धावांचं कठीण आव्हान, लॉर्ड्सवर 1975नंतर मोठा विक्रम
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 19, 2026 | 7:30 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. खरं तर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकचा हा निर्णय योग्यच ठरला. कारण इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. भारताला इंग्लंडची पहिली विकेट घेण्यासाठी 192 धावांपर्यंत वाट पाहावी लागली. यावरून भारतीय गोलंदाजांची किती घाम निघाला हे दिसून येतं. इंग्लंडने 50 षटकात 3 गडी गमवून 387 धावा केल्या. तसेच विजयासाठी 388 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान गाठण्याचं भारतीय फलंदाजांसमोर आव्हान आहे. या सामन्यात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली काय करतात याकडे लक्ष असणार आहे. हा सामना भारताने गमावला तर टी20 नंतर वनडे मालिकाही भारत गमवेल. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष असेल. इंग्लंडची लॉर्ड्सवरची सर्वाधिक वनडे धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी इंग्लंडने भारताविरुद्ध याच मैदानात 1975 मध्ये 4 विकेट गमवून 334 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत निघाला आहे.

इंग्लंडचा डाव

इंग्लंडकडून बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी जबरदस्त सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 192 धावांची भागीदारी केली. जेकब बेथेल 93 चेंडूत 91 धावांची खेळी करून बाद झाला. त्याने या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर बेन डकेट आणि जो रूट यांची जोडी जमली. या जोडीनेही भारतीय गोलंदाजांचा दम काढला. या जोडीने 80 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली. या दरम्यान बेन डकेटने शतक ठोकलं. तर 135 चेंडूत 18 चौकार आणि 1 षटकार मारत 141 धावांवर बाद झाला. जो रूट एका बाजूने शांत आणि संयमी फलंदाजी करत होता. त्यानेही अर्धशतकी खेळी केली. कर्णधार हॅरी ब्रूक त्याची साथ फार काळ देऊ शकला नाही. 12 चेंडूत 14 धावांची खेळी करून बाद झाला.

भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी

भारताकडून पाच गोलंदाजांनी इंग्लंडसमोर गोलंदाजी केली. पण त्यात प्रसिद्ध कृष्णा आणि प्रिंस यादव वगळता एकही गोलंदाजाला यश मिळालं नाही. अर्शदीप सिंगने 10 षटकात 72 धावा दिल्या. तर गुरनूर ब्रार हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात 97 धावा दिल्या. तर अक्षर पटेलने फिरकीच्या जोरावर काही अंशी इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक लावला. त्याने 10 षटकात एकही गडी बाद केला नाही, पण 61 धावा दिल्या. या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी प्रभावी ठरली. प्रसिद्ध कृष्णाने 10 षटकात 69 धावा दिल्या आणि दोन विकेट काढल्या. यात स्पेलमध्ये दोन षटकं निर्धाव टाकली.

Follow Us