
तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने पहिल्या दिवशी सावध खेळी केली. यामुळे पहिल्या दिवसावर भारताची मजबूत पकड दिसून आली. भारताने पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 4 गडी गमवून 264 धावा केल्या आहेत. खराब प्रकाशमानामुळे पहिल्या दिवशीचा खेळ 83 षटकांचा झाला. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांना मिळून 94 धावांची खेळी केली. पण ख्रिस वोक्सने केएल राहुल 46 धावांवर असताना विकेट काढली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन ही जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. यशस्वी जयस्वालने 107 चेंडूंचा सामना करत 58 धावा केल्या. तर दोन कसोटी सामन्यांच्या विरामानंतर संधी मिळालेला साई सुदर्शनने चमकदार कामगिरी केली. त्याने 151 चेंडूंचा सामना केला आणि 7 चौकार मारत 61 धावा केल्या. पण स्टोक्सने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
कर्णधार शुबमन गिलकडून या सामन्यात फार अपेक्षा आहेत. पण पहिल्या डावात त्याची बॅट काही चालली नाही. अवघ्या 12 धावांवर असताना बेन स्टोक्सने त्याला पायचीत केलं. त्यामुळे संघावरील दडपण वाढलं. पण उपकर्णधार ऋषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. साई सुदर्शनसोबत भागीदारी केली. त्याने 48 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 37 धावांची खेळी केली. पण भारतीय डावाच्या 68 व्या षटकात ख्रिस वोक्सच्या एका वेगवान यॉर्कर बॉलने पंतला दुखापतग्रस्त झाला. पंतने या चेंडूवर रिव्हर्स-स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट त्याच्या बुटावर लागला. त्यानंतर फिजिओने ताबडतोब मैदानात धाव घेतली. तेव्हा त्याच्या पायातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. दुखापतीची तीव्रता आणि वेदना पाहता त्याला ग्राउंड एम्ब्युलन्समध्ये मैदानाबाहेर नेण्यात आले. 37 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट झाला.
Rishabh Pant is driven off the field of play after suffering some severe swelling on his right foot and Ravindra Jadeja walks out to the middle… 🩹 pic.twitter.com/vJlu5CABQ8
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 23, 2025
ऋषभ पंतला दुसऱ्यांदा कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे आता मैदानात परतेल की नाही हे सांगणं कठीण आहे. दुसऱ्या सामन्यातही विकेटकीपिंगवेळी जसप्रीत बुमराहचा वेगवान बाउन्सर पंतच्या बोटाला लागला होता. त्यामुळे त्याने त्या सामन्यात विकेटकीपिंग केली नाही. मँचेस्टर कसोटीत खेळणार की नाही याबाबतही शंका होती. मात्र तो या सामन्यात फलंदाजीसाठी उतरला होता. आता त्याची दुखापत गंभीर असेल तर भारताचं टेन्शन वाढेल.