IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यात सर्व खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले, कारण की…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. नाणेफेक गमवल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. शुबमन गिलने पहिल्याच कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि पहिल्यांदा फलंदाजी करावी लागत आहे. असं असलं तरी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात युवा संघ मैदानात उतरला आहे. त्यामुळे या संघाकडून फार अपेक्षा नसल्या तरी चांगल्या खेळी अपेक्षा आहे. असं असताना भारत आणि इंग्लंडचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारत आणि इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी पहिल्या दिवशीच्या सामन्यात काळ्या पट्ट्या बांधून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. लीड्स कसोटी सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांनी राष्ट्रगीतासाठी मैदानावर उतरले. यावेळी त्यांनी प्रथम अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिट मौन पाळले.
बीसीसीआयने एक्स या सोशल मीडियावर खात्यावर लिहिलं की, ‘भारतीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघाने हेडिंग्ले, लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी अहमदाबाद विमान अपघातातील बळींच्या स्मृतीप्रित्यर्थ मौन पाळले. प्रभावित झालेल्यांशी एकता दर्शविण्यासाठी संघांनी काळ्या हाताच्या पट्ट्या बांधल्या. संघ त्या सर्व लोकांच्या कुटुंब आणि मित्रांप्रति तीव्र संवेदना व्यक्त करते ज्यांनी दुखदपणे जीव गमावला आहे.’
The Indian Cricket Team and the England Cricket Team observed a moment of silence in memory of the victims of the Ahmedabad plane crash ahead of the start of play on Day 1 of the first Test at Headingley, Leeds.
The teams are wearing the black armbands to express solidarity with… pic.twitter.com/Guxf1aO8iJ
— BCCI (@BCCI) June 20, 2025
12 जून रोजी अहमदाबाद विमान अपघातात 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हे विमान अहमदाबादहून लंडनसाठी रवाना झालं होतं. पण काही सेकंदात विमान कोसळलं. या अपघातात भारतासह इंग्लंडचे नागरिकांचाही मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर दोन्ही संघाचे खेळाडू पहिल्यांदा मैदानात उतरले. तेव्हा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधलेली दिसली.
